सेलू : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ, विधवा, परितक्त्या आदी लाभार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी सेलू तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अपंग आदी व्यक्तींसाठी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून मिळणारे मानधन मागील चार वर्षांपासून लाभार्थ्यांना मिळाले नाही. या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वाटप करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संजय रोडगे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक पावडे, तालुकाध्यक्ष अशोक काकडे, सारंगधर महाराज रोडगे, राजेंद्र लहाने, गणेश नाईकवाडे, डॉ.जगन्नाथ जाधव, प्रताप सोळंके, अॅड.रामेश्वर शेवाळे, माऊली ताठे, अरविंद थोरात, पंजाब पौळ, संतोष डख, शेख शफीक, विठ्ठल कोकर, सुधाकर रोकडे, शिलाताई शेरे, ज्योतीताई यादव, अर्चना सोळंके, शेख खय्युम, इसाक पटेल आदींची उपस्थिती होती. दरम्यान, तालुक्यातील हजारो लाभार्थी या मोर्चात सहभागी झाल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली. सेलू तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांनी पोटाला चिमटा देऊन संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केले. परंतु, लोकप्रतिनिधींनी बैठक न घेतल्यामुळे हे प्रस्ताव धूळ खात पडले. परिणामी हजारो लाभार्थी साडेचार वर्षांपासून अनुदानापासून वंचित राहिले. अनेक प्रस्ताव तहसील कार्यालयातून गहाळ झाल्याने लाभार्भ्यांना अनुदान मिळाले नाही. निराधारांचे प्रस्ताव मार्गी लावून प्रशासनाने तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे, असे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सेलूत निराधारांचा मोर्चा
By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST