उस्मानाबाद : अर्धा पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. अत्यल्प पावसावरच बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून, पावसाने उघडीप दिल्याने या पिकांचीही वाढ खुंटली आहे. दुसरीकडे पावसाअभावी जिल्ह्यातील सतरापैकी चार मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले असून, पाच प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. शिवाय एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगावमध्ये ४.३८२ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असला तरी यात उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी शून्य आहे. यामुळे जिल्हावासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघु प्रकल्प व साठवण तलाव आहेत. यापैकी भूम आणि परंडा या तालुक्यातील बाणगंगा मध्यम प्रकल्प वगळता इतर रामगंगा, संगमेश्वर, खासापूर या प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली तर चांदणी, खंडेश्वर व साकत हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. शिवाय एकमेव मोठा असलेला सीना-कोळेगाव या परंडा तालुक्यातील प्रकल्पही उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी शून्य आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांना टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरमध्येही सर्वाधिक ३३ टँकर हे भूम तालुक्यात असून, परंडा तालुक्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय भूममध्ये ६९ तर परंडा तालुक्यात तब्बल १०० जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. उसनाबाद तालुक्यात तेरणा, रूई आणि वाघोली हे तीन मध्यम प्रकल्प असून, यातही अत्यल्प साठा शिल्लक आहे. तेरणा धरणात ११.४२, रूईमध्ये ६.४४ तर वाघोली धरणात १२.३९ टक्के इतके उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह तेरणा धरणावर अवलंबून असलेल्या येडशी, कसबे तडवळे, ढोकी व तेर ही चार गावांनाही तीव्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात १४.९६, हरणी प्रकल्पात ४.४४ तर खंडाळा प्रकल्पात केवळ २.६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पांवरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांनाही टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. उमरगा तालुक्यात जकापूर, तुरोरी आणि बेन्नीतुरा हे तीन मध्यम प्रकल्प असून, यातील जकापूर आणि तुरोरी या दोन्ही प्रकल्पातील साठा ज्योत्याखाली गेला आहे. तर बेन्नीतुरा प्रकल्पात सद्यस्थितीत ११.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर कळंब तालुक्यात एकमेव असलेला रायगव्हाण मध्यम प्रकल्पही कोरडाठाक पडला आहे. (प्रतिनिधी)अधिग्रहणांचा आकडाही चारशेवरजिल्ह्यात टँकरसोबतच अनेक गावांत विहीर, विंधन विहीर आदी जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. एकूण २३४ गावांसाठी तब्बल ४२८ स्त्रोतांचे अधिग्रहण असून, यात सर्वाधिक १०० अधिग्रहणाची संख्या परंडा तालुक्यात आहे. या तालुक्यात ४६ गावांसाठी या स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय उस्मानाबाद तालुक्यातही ३९ गावांसाठी तब्बल ९६ स्त्रोत अधिग्रहीत करण्यात आली आहेत. तुळजापूर तालुक्यात सहा गावांत आठ, उमरग्यात तेरा गावांत २४, लोहाऱ्यात १० गावांत अठरा, भूममध्ये ४६ गावांत ६९, कळंब तालुक्यात ५८ गावांत ९२ तर वाशी तालुक्यात सोळा गावांत २१ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७४ गावांची मदार टँकरवरजिल्ह्यातील टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य स्थितीत तब्बल ७४ गावे आणि अकरा वाड्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात असून, यासाठी १३ शासकीय तर ६३ खाजगी अशा ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक संख्या भूम तालुक्यात ओ. भूम तालुक्यातील ३३ गावे आणि ११ वाड्यांना ३३ टँकर सुरू आहेत. तुळजापूर आणि लोहारा तालुक्यात मात्र अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर उस्मानाबाद तालुक्यात केवळ दोन गावांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय उमरगा तालुक्यात चार गावांसाठी चार, कळंबमध्ये अठरा गावांसाठी २२, वाशीत दहा गावांसाठी आठ तर परंडा तालुक्यात सात गावांसाठी सात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७४ गावे आणि अकरा वाड्यांना एकूण ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २३४ गावांत तब्बल ४२८ जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. जिल्हाभरात ४ हजार ९८४ हातपंप आहेत. अद्यापि एकही दमदार पाऊस न झाल्याने सध्या शेकडो हातपंप आटण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनल्याने तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेली जनावरे शेतकरी कवडीमोल दराने विकत आहेत.
चार मध्यम प्रकल्प कोरडेठाक
By admin | Updated: July 29, 2014 01:09 IST