जालना : तीन विस्तार अधिकाऱ्यांसह एका ग्रामसेविकेने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या चारही कर्मचाऱ्यांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.जामवाडी येथील जि.प. सदस्या सरला वाडेकर यांनी याबाबतचा आक्षेप ३ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. जालना पंचायत समिती अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी के.डी. भुतेकर, एम.एस. जायभाये व बारगजे यांनी २७ जून १९९६ च्या शासन निर्णयानुसार प्रतिमाह १० ग्रामपंचायतीची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु ती त्यांनी केली नाही, अशी तक्रार वाडेकर यांनी केली होती. त्याचप्रमाणे मासिक दैनंदिनी मुदतीत सादर न करणे, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कारखान्याकडून नियमानुसार कर आकारणी न करणे व नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करणे याही मुद्यांचा तक्रारीत समावेश होता. या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी अहवाल पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांनी सादर केला होता. भुतेकर, जायभाये व बारगजे या तिघांची एक वर्षाची वेतनवाढ बंद करण्यात आली. तसेच गोंदेगाव ता. जालना येथील ग्रामसेविका के.पी. इंगळे यांनी अकृषक परवाना नसताना व ज्यांचे नावे खरेदी खत आहे, त्यांचे नावे नमुना क्रमांक ८ ला नोंद न करता त्यांच्या मुलाचे नावे नोंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इंगळे यांचीही एक वर्षाची वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. जालना पंचायत समितीच्या उपकर अनुदानातून घेण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात केलेल्या अनियमिततेबाबत तत्कालीन गटविकास अधिकारी यांचा खुलासा मागवून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार कर्मचाऱ्यांची एक वार्षिक वेतनवाढ बंद
By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST