जालना : होळीसणानिमीत्त आयोजित पार्टीत गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाच घरातील पाच जण गंभीर तर दोनजण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी प्रितीसुधानगर येथे घडली.पैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये संदीप कांगणे, गणेश कांगणे, विजय वाघ, विजय कांगणे, राधाबाई कांगणे, सचिन डिघोळे, पेंटर महामुने आदींचा समावेश आहे. सातही जखमींना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. होळीसणानिमीत्त संदीप कांगणे यांच्या घरी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास घरी मेजवाणीचा बेत आखण्यात आला होता. परंतु संदीप कांगणे आणि त्याची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेजवाणी असल्याने संदीप याने मद्यप्राशन केले होते. पत्नीशी वाद झाल्याने संदीपने सिलिंडरची नळी काढून टाकली आणि स्वयंपाकगृहाचा दरवाजा आतून बंद केला. त्याने रागाच्या भरात आग लावली. स्फोटाचा आवाज आल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून पती आणि पत्नीला वाचविण्यासाठी आत प्रवेश केला. परंतु संपूर्ण घरात सिलिंडरमधील वायू पसरलेला असल्याने तेही जखमी झाले. त्यापैकी चार जण गंभीर भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. सदर घटनेची सदर बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्सटेबल ए. आर. डावखरे यांनी दिली. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, नगरसेवक गणेश राऊत, शिवसेनेचे भाऊसाहेब पाऊलबुद्धे यांनी औरंगाबाद येथे जाऊन जखमींची भेट घेतली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. (प्रतिनिधी)
सिलेंडर स्फोटात चौघे गंभीर
By admin | Updated: March 26, 2016 00:51 IST