नवी दिल्ली : चार केंद्रीय पोलीस संस्थांचे कामकाज पूर्णवेळ प्रमुखांशिवाय सुरू आहे. त्यांच्या नियुक्त्या बऱ्याच कालावधीपासून रखडल्या आहेत.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख राजेश रंजन या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. या पदाचा अतिरिक्त पदभार एसएसबीचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा यांच्याकडे देण्यात आला आहे. सीआयएसएफचे नियमित महासंचालक नियुक्त होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे हा पदभार राहील. याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत.
अशाच प्रकारे संघीय दहशतवादविरोधी दल एनएसजी, एनसीबी आणि केंद्रीय पोलीस थिंक टँक ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) यांच्या प्रमुख पदाचा पदभार विविध आयपीएस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे.
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस प्रमुख एस. एस. देसवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चा पदभार ३० सप्टेंबरपासून देण्यात आला आहे. ए. के. सिंग सेवानिवृत्त झाल्यानंतर याबाबत आदेश जारी करण्यात आले. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे एनसीबीच्या प्रमुखपदाचा अतिरिक्त पदभार आहे. मागील जुलैमध्ये अभय यांची हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचकडे पदभार गेला. अभय हे सध्या ओडिशाचे पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) व्ही. एस. के. कौमुदी यांच्याकडे बीपीआरडीच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ते केंद्रीय गृह मंत्रालयात असून, मागील ऑगस्टपासून याही पदाचा कार्यभार पाहत आहेत.
मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीची (एसीसी) लवकरच बैठक होणार असून, त्यानंतर या नियमित पदावरील नियुक्त्या करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. एसीसी ही दोन सदस्यीय समिती असून, यात प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे.