लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १३ सप्टेंबर रोजी पडलेल्या दरोड्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़ या आरोपींकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला़येलदरी येथील वराहपालन केंद्रावर १३ सप्टेंबर रोजी हा दरोडा पडला होता़ दरोडेखोरांनी वराह पालन केंद्रावरील २ लाख २६ हजार ५०० रुपये किंमतीचे डुकरे टेम्पोत टाकून पलायन केले होते़ या प्रकरणी प्रीतम वाकळे यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता़ या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी क्रिपासिंग हत्यारसिंग टाक (३२, रा़ इंदिरा गांधीनगर कळमनुरी), मारोती हुसेनी मानपाडे (२२, रा़ अहमदपूर), कृष्णासिंग पापासिंग बावरी (२५, भारतनगर, अहमदपूर), परशूराम भीमराव काळगिरे (२२, रा़ बनवस ता़ पालम) या चार आरोपींना अटक केली आहे़आरोपींनी दरोड्याची कबुली दिली असून, ४० हजार रुपये किंमतीचे २५ डुकरे आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (क्रमांक एमएच २२ एए-३९५) असा २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ दरोडा टाकताना सोबत असलेल्या इतर आरोपींची नावेही या चौघांनी पोलिसांना सांगितली आहेत़ त्यामुळे उर्वरित आरोपींनाही अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले़
येलदरीच्या दरोड्यामधील चार आरोपींना केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:16 IST