औरंगाबाद : जळगाव रोडच्या बाजूला साईड मार्जिनमधील १५ मीटर रस्ता मागील अनेक वर्षांपासून हरवला होता. रस्ता हरवल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी युद्धपातळीवर रस्ता शोधून काढण्याचे आदेश दिले. गुरुवारी मनपाला १ कि. मी. रस्ताही सापडला. आता या रस्त्याच्या बांधकामाचे नियोजन मनपाकडे अजिबात नाही. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे होणार हे निश्चित.सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत एका बाजूने १५ मीटर गुळगुळीत रस्त्याचा वापर नागरिक करीत आहेत. जळगाव रोडच्या पूर्वेलाही असाच १५ मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. मागील तीन दशकांपासून मनपा या हरवलेल्या रस्त्याकडे अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. यापूर्वी अनेकदा अतिक्रमणांवर मार्किंग करण्यात आली होती. मात्र, कारवाई कोणीच करीत नव्हते. काही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळविला आहे. महापालिकेने हा स्थगिती आदेशही उठविण्यासाठी आजपर्यंत कारवाई केलेली नाही. रस्त्यात बाधित होणाऱ्या काही खाजगी मालमत्ताही आहेत. या मालमत्ताधारकांना रीतसर भूसंपादनाची नोटीस देणे, त्यांना टीडीआर, एफएसआय वाढवून देण्याचे आश्वासन देणे आदी कोणतीच कारवाई मनपाने केलेली नाही. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मनपाने गुरुवारी हर्सूल टी पॉइंट येथे १५ मीटर रुंद रस्त्यावरील २० पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काढण्यात आलेल्या अतिक्रमणांचा मलबा आजही तेथेच पडून आहे. या भागात रस्ता तयार करण्यासाठी मनपाकडे १ रुपयाचीही आर्थिक तरतूद नाही. रस्ता तयार करणाऱ्या विभागाने याची साधी दखलही घेतली नाही. फक्त अतिक्रमण हटाव पथकाने आपले कर्तव्य बजावले. इतर विभाग बघ्याची भूमिका बजावत आहेत. परिणामी परत अतिक्रमणे होणार हे निश्चित.नगररचना विभागाने मार्किंगची कारवाई पूर्ण केल्यानंतर आम्ही अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्ता तयार करणार आहोत. अलीकडेच कटकटगेटवर आम्ही अशाच पद्धतीने कारवाई केली आहे. अतिक्रमणे जसजशी काढण्यात येतील तसतसे कच्चे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. -सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, मनपा
पुढे पाठ मागे सपाट
By admin | Updated: October 16, 2016 01:11 IST