परतूर : परतूर पंचायत समिती काही महिन्यांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी व एकही अभियंता नसल्याने दैनंदिन कामकाज पूर्णत: कोलमडले आहे. परतूर पंचायत समितीस बऱ्याच महिन्यांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी नाहीत. यामुळे येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. कोणी कधीही यावे, कोठेही जावे, कोठेही भटकावे असे चित्र आहे. गटविकास अधिकाऱ्यापाठोपाठच आता इतर अधिकारी व कर्मचारीही या पंचायत समितीतून इतरत्र वर्ग करण्यात आले आहेत. परंतु त्या सर्वांचे वेतन येथील पं. स. तून काढले जात आहे. यामध्ये कृषि विस्तार अधिकारी बी.एस. कांबळे हे घनसावंगीत कार्यरत आहेत, कनिष्ठ सहाय्यक एन. एस. गोलवाले हे औंरगाबाद येथील राज्य माहिती आयोगात प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. शाखा अभियंता आर. बी. कदम हे जालना येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत वर्ग करण्यात आले आहेत. येथील कर्मचारी इतरत्र वर्ग करून या पंचायत समितीतील कामांचा मात्र खोळंबा झाला आहे. अभियंताच नसल्याने ग्रामीण भागातील विकास कामे करतांना अडचणी येत आहेत. यासंदर्भात पं. स. च्या पदधिकाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे या कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे मात्र वरिष्ठ पातळीवरुन दुर्लक्ष करण्यात आले.इतरत्र वर्ग करण्यात आलेले कर्मचारी तात्काळ परत बोलावून कामे मार्गी लावावीत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ंसभापतीच टाळे ठोकणार यांसदर्भात सभापती छाया माने म्हणाल्या की, या प्रकराची आम्ही वरिष्ठांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार केली. कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगितले. शेवटी आम्हीच पं. स. कार्यालयास कुलूप ठोकून जिल्हा परिषद प्रशासनाचे या कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु असा इशारा दिला.तालुक्यातील ग्रामीण जनतेचे प्रमुख केंद्र प्रमुख पंचायत समितीकडे पाहिले जाते. अनेक कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकही अधिकारी अथवा कर्मचारी जागेवर सापडत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
पूर्णवेळ बीडीओ मिळेना
By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST