औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांचा कार्यकाळ दोन दिवसांपूर्वीच संपला. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे अद्याप राजीनामे सादर केलेले नाहीत. राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर ५ नोव्हेंबर रोजी शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राजीनाम्यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.३१ आॅक्टोबर रोजी मनपातील दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. पदाधिकारी राजीनामा कधी देतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडूनही राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. यंदा महापौरपद भाजपला देण्यात आले असून, ते सुद्धा ३६५ दिवसांसाठीच. सेनेच्या महापौरांनी राजीनामा उशिरा दिल्यास आम्हाला कमी दिवस सत्ता मिळेल असे भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, महापौरपद मिळविण्यासाठी अनेक नगरसेवकांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत राजू शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ बापू घडामोडे यांचेही नाव चर्चेत आहे. पक्षश्रेष्ठींनी अजून उमेदवार निश्चित केला नाही. विद्यमान महापौर, उपमहापौरांनी आयुक्तांकडे राजीनामे सादर केल्यावर भाजप उमेदवारी निश्चित करणार आहे. ऐन दिवाळीत महापौर, उपमहापौरांकडून राजीनामा घेणे योग्य नाही. दिवाळीनंतर ही सर्व प्रक्रिया करण्याचा निर्णय सेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच घेतला होता. आता दिवाळी संपली असून, राजीनामा कधी घेणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, सेनेच्या स्थानिक नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर स्वत: शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राजीनाम्यावर अंतिम निर्णय होईल. सर्वसाधारण सभा आयोजित करून राजीनामा देणे किंवा थेट आयुक्तांकडे जाऊन राजीनामा देणे यात फारसा फरक नाही. कायदेशीर बाबी तपासूनच ही सर्व प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजीनाम्यावर शनिवारी अंतिम निर्णय
By admin | Updated: November 2, 2016 00:48 IST