औरंगाबाद : शहरात बेकायदेशीरपणे मांस विक्री करणाऱ्यांवर मनपाने कारवाईचा बडगा उगारला असून, पडेगाव-नाशिक रोडवर उघड्यावर बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपाचे अनधिकृत कत्तल पथकप्रमुख शेख शाहेद शेख निजाम यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. कोणतीही परवानगी न घेता मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
परवाना नसताना शहरात मांसविक्रीची दुकाने उघडपणे सुरू आहे. रहिवासी भागातही मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुकाने सुरू झाली आहेत. विशेष बाब म्हणजे आसपासच्या नागरिकांची संमतीसुद्धा घेतली जात नाही. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला तात्पुरते छत उभारून मांसविक्री केली जात आहे. मनपाचे अनधिकृत कत्तल पथकप्रमुख शेख शाहेद शेख निजाम हे वाहनचालक कैलास नामदेव खिल्लारे, नदीम अहेमद खान, आनंद सुखदेव घायतडक, फेरोज खान शैकत खान यांच्यासमवेत ६ जानेवारीला दुपारी तीन वाजता पडेगाव- नाशिक रोडवर गस्त घालत होते. पोलीस कॉलनी रोडलगत शेख निसार शेख चांद (वय ४२, रा. पोलीस कॉलनी) हा उघड्यावर बेकायदेशीरपणे मांस विक्री करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्याला मांस विक्री परवाना, तसेच मनपाच्या कत्तल खाण्यात बकरे कत्तल केल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावतीबाबत विचारणा केली. दोन्हीही बाबी नसल्याचे समजताच बेकायदेशीरपणे मांस विक्री व मटण दुकानात अवैध कत्तल करून निरुपयोगी अवयव परिसरात फेकून दुर्गंधी पसरविल्याबद्दल संबंधिताविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.