उस्मानाबाद : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला अचानक भेट देऊन तेथे चालणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीची तसेच इतर बाबींची तपासणी केली. यावेळी सुमारे चाळीस टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. सोमवारी सकाळी दहा वाजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कार्यालयांना भेटी देऊन तेथील हजेरी पुस्तक ताब्यात घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी संबंधित कार्यालय प्रमुख उपस्थित आहेत काय, याची पाहणी करत तसेच उपलब्ध कर्मचारी व हजेरी पटावरील कर्मचाऱ्यांचीही त्यांनी माहिती घेतली. प्रत्येक कार्यालयात त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली, काही ठिकाणी अस्वच्छ तसेच कागदपत्रांची अस्ताव्यस्तता दिसल्याने तेथे तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले. या मोहिमेनंतर दुपारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छता व शिस्तीबाबत सूचना केल्या. कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या व विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे व संबंधित कार्यालय प्रमुखांचा अहवाल मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांना पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या मोहिमेत अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
पन्नास कार्यालयांची तपासणी
By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST