उस्मानाबाद : नव्याने इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून ५० प्रस्ताव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते. नुकतीच या प्रस्तावांची छाननी करण्यात आली असून २२ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यामुळे जवळपास पन्नास टक्क्यांवर प्रस्ताव विविध त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत.शहरांसोबतच आता ग्रामीण भागातील पालकांमध्येही इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांचे जाळे झपाट्याने विस्तारताना दिसून येत आहे. याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. इंग्रजी शाळांची संख्या वाढू लागल्याने पटसंख्या कमी होवून जिल्हा परिषदेचे शिक्षक तितक्याच झपाट्याने अतिरिक्त होताना दिसतात. यंदाही नव्याने इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी सर्वाधिक ५० प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांची छाननी शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. छाननीअंती केवळ २२ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. हे प्रस्ताव आता शासनाच्या मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत असल्याने दरवर्षी नव्याने शाळा सुरू करू इच्छिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गतवर्षी ६२ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ४० ते ४२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली होती. यंदाही ५० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले होते. छाननीअंती २२ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. आणखी शासनाची मंजुरी मिळणे बाकी असले तरी इंग्रजी शाळांच्या संख्येमध्ये भर पडणार, हे निश्चित !
पन्नास टक्क्यांवर प्रस्ताव ठरले अपात्र
By admin | Updated: September 1, 2014 01:07 IST