माहोरा : येथील बस स्थानक परिसरातील रहिवाश्यांपैकी अनेकांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली आहे. खाजगी दवाखान्यात १५ जणांना दाखल करण्यात आले आहे.येथील बस स्थानक परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय व माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दूषित पाण्याच्या आरोपाचे व गॅस्ट्रोचे खंडण केले जात आहे. वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही सुविधा नाहीत. सध्या माहोरा येथील खाजगी रुग्णालयात १५ पेक्षा अधिक गॅस्ट्राचे रुग्ण उपचार घेत आहेत. माहोरा, जवखेडा, जानेफळ, चिंचखेड, येवता, चापनेर, बेलोरा, धोनखेडा, वडाळा, बोरगाव फदाट, बोरी, आसई, कोल्हापूर, वरुड खुर्द, कड पिंपळगाव, भोरखेडा, म्हसरुळ, घानखेडा आदीसह माहोरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये गॅस्ट्रो, ताप, खोकला, थंडीच्या साथीने थैमान घातले आहे. आरोग्य खाते व ग्रामपंचायतने झोपेचे सोंग घेण्याचे धोरण अवलंबिले असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
माहोऱ्यात आढळले गॅस्ट्रोचे पंधरा रुग्ण
By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST