उस्मानाबाद : नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात तेरणा कारखान्यात गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. यावरून शनिवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी झडल्या. सदर अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे सांगत यातील अनेक बाबी मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील असल्याचे आ. ओम राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे. तर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख यांनी सत्य जनतेसमोर आणण्यासाठी कारखान्याने तातडीने लेखापरिक्षण करून घेण्याचे आवाहन केले. प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांनी १४ जुलै रोजी साखर आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. या अहवालात अद्याप अकरा प्रकरणांत गंभीर दोष असल्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने शनिवारी आ. ओम राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांसमोर कागदपत्रे सादर केली. मागील पाच वर्षात एकही साखरेचे पोते उधार दिलेले नसल्याचे सांगत या अहवालात नमूद केलेल्या बारदान्याचा मुद्दा, तेरणा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाकडील अॅडव्हान्स, तसेच अर्कशाळा लिजवर देणे, मळी, बगॅस व साखर विक्री याच्या दरातील फरक हे सर्व प्रकार कारखान्याची सत्ता आमच्याकडे येण्यापूर्वीचे असल्याचे सांगत अहवालातील मुद्दे खोडून काढले. तसेच पूर्वीचे लेखापरिक्षण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे आमच्या काळातील लेखापरिक्षण करण्यास अडथळे येत असल्याचेही ते म्हणाले.सन २००७-०८ ते २००९-१० या कालावधीतील लेखापरिक्षणात गंभीर बाबी असल्याचे सांगत, सहसंचालकांनी विरोधकांकडे कारखाना असतानाच्या व्यवहाराचे आकडे जाणीवपूर्वक अहवालात नमूद करून दिशाभूल केल्याचा आरोपही निंबाळकर यांनी केला. तेरणा कारखान्याच्या अनुषंगाने समोरासमोर चर्चा करण्यासाठी आपण केव्हाही तयार आहोत. मात्र, अगोदर प्रश्न द्या, त्याची उत्तरे देऊ, असे विरोधक म्हणतात. असे प्रश्न लिहून दिले तर या चर्चेला अर्थ राहणार नसल्याचेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सहसंचालकांनी दिलेल्या अहवालात विद्यमान संचालक मंडळाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करीत संचालक मंडळात दोष निर्माण झाल्याचे म्हटले होते. यावर आ. निंबाळकर यांनी संचालक चेअरमनकडे राजीनामे देत असतात. सदर राजीनामे मंजूर नसताना अहवालात संचालक कार्यरत नसल्याचे सांगणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. उस्मानाबाद : प्रादेशिक सहसंचालकांनी सादर केलेल्या अहवालातील मुद्दे गंभीर आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करतानाच गैरव्यवहार कुणाच्या कालावधीत झाले, हे जनतेला स्पष्ट व्हावे म्हणून कारखान्याचे रखडलेले लेखापरिक्षण तातडीने करून घ्यायला हवे, असे तेरणा कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सगळ्या बाबी मागील संचालक मंडळावर ढकलून जबाबदारी टाळता येणार नाही. मागील पाच वर्षे कारखान्याची सत्ता असताना जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, असा सवाल करीत कर्मचारी लेखापरिक्षणासाठी सहकार्य करण्यास तयार आहेत. तर मग, लेखापरिक्षण का होत नाही, असा सवाल देशमुख यांनी केला आहे. निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन कारखान्याचे लेखापरिक्षण करून घेतल्यास सत्य जनतेसमोर येईल, असे सांगत तेरणा कारखान्यासंदर्भात मुद्देसूद चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. राजीनामे देण्यासाठी कारखान्यात कोणीही नसल्याने संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांच्याकडे ते पाठविले आहेत. अशा स्थितीत संचालकांचे राजीनामे मंजूर नसल्याचे सांगणे चुकीचे असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे. आमच्या कार्यकाळात चुकीचे काहीही घडलेले नाही. त्यामुळे कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तेरणा’वरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी
By admin | Updated: July 20, 2014 00:31 IST