लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेठशिवणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीतील कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी ३ आॅक्टोबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. सुमारे शंभर कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.मार्च २०१७ पासून कामगारांचे थकलेले पगार करावेत, वीजपुरवठा खंडित केल्याने सूतगिरणीचे काम ठप्प पडले आहे. तेव्हा वीजपुरवठा सुरू करावा, कामगारांच्या पगारातून कपात केलेल्या पी.एफ.च्या पावत्या द्याव्यात, कामगारांना नियुक्तीपत्र व आलेख पत्र देण्याची व्यवस्था करावी, सूतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त करावा, १९९९ पासून काम करणाºया कामगारांना नोकरीत कायम करावे आदी मागण्या कामगारांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत.मंगळवारी सकाळी १० वाजेपासून या कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला. त्यानंतर दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सुधाकर उपलवार, कोंडीबा आष्टूरकर, मोहन कांबळे, मीराबाई कांबळे, सीताबाई खेडकर, मनीषा कांबळे, सीताबाई खेडकर, गणेश कुंभार, दिलीप वाडेवाले, शशिकला शेटे, कुंताबाई पोरजाळे, सखूबाई आंबोडे आदी सुमारे १०० कामगार सहभागी झाले आहेत.
थकीत वेतनासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:32 IST