माजलगाव: सहायक निबंधक व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी हे भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या चेअरमन यांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी भोई समाजाने सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील माणिक शहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ बोगस असल्याचा आरोप भोई समाजाने केला आहे. ३० आॅगस्ट २००८ रोजी तत्कालीन सहायक निबंधक कांबळे यांनी ३ सभासदांची प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली होती व या संस्थेचे बोगस चेअरमन व संचालक मंडळ यांना बरखास्त केले होते. तरी सहायक निबंधक बोराडे यांच्या कूटनीतीच्या धोरणामुळे बोगस चेअरमन व संचालक मंडळ आजही संस्थेचा कारभार भ्रष्ट मार्गाने चालवत आहेत. सदरील संस्थेच्या बोगस चेअरमनला जिल्हा मत्स्य विकास अधिकारी पवार हे कोणत्या आधारे मत्स्य ठेके व शासकीय अनुदान देतात असा प्रश्न यावेळी उपोषणात सहभागी झालेल्या भोई समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सहायक निबंधक बोराडे व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी पवार हे बोगसरीत्या माजलगाव धरणाचा ठेका घेऊन मासेमारी करतात. यामुळे २ हजारांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या भोई समाजावर अन्याय होत आहे. रॉयल्टीच्या नावाखाली लूट करुन कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सहायक निबंधक, जिल्हा मत्स्य विकास अधिकारी व माणिक शहा मत्स्य व्यवसाय संस्थेचे चेअरमन यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात भोई समाजाने केली आहे. दोन हजार कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न माजलगाव तालुक्यात १० ते १२ हजारपेक्षा जास्त भोई समाजाची संख्या आहे. भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हा आहे. मात्र शासनाने मासेमारीचा ठेका देत असताना भोई समाजाला डावलून दुसर्याच संस्थेला दिला आहे. कुठल्याही धरणाचा मासेमारीचा ठेका देत असताना संबंधित संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांना मासेमारी आली पाहिजे, हे निकष आहेत. मात्र ज्यांनी हा ठेका घेतला आहे त्या संस्थेतील बहुतांश जणांना जाळे देखील टाकता येत नाही, अशी स्थिती आहे, असा आरोप शेख निसार पटेल, रमेश साळवे, प्रल्हाद गायकवाड यांनी केला आहे. उपोषणात भोई समाजाच्या कार्यकत्यांचा समावेश होता. यावेळी आव्हान संघटनेचे अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी सांगितले की, जर भोई समाजाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सतत उपोषण, आंदोलने करू. शासनाच्या कीचकट धोरणामुळे दोन हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे माजलगाव येथील भोई समाजाच्या आंदोलनात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (वार्ताहर)
भोई समाजाचे तहसीलसमोर उपोषण
By admin | Updated: May 20, 2014 01:08 IST