औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील वडोदभिल्ल येथील शेतमजूर कचरू गजाराम गायसमिंद्रे (६०) यांच्या खूनप्रकरणी दोघा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. शेटे यांनी मंगळवारी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.जन्मठेपेची शिक्षा सुनाविलेल्या आरोपींची नावे श्रीराम येळे आणि रामराव मनगटे अशी आहेत. हे दोन आरोपी आणि मयत कचरू गायसमिंद्रे हे तिघे २६ जानेवारी २०१३ रोजी एका मोटारसायकलवर सोबत गेले होते. मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर त्याचे पैसे कुणी द्यायचे या कारणावरून या तिघांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच वरील दोन आरोपींनी कचरू गायसमिंद्रे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. अशोक सपकाळ यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर फिर्यादी कमलाबाई गायसमिंद्रे यांनी या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिशोर पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुदेश शिरसाट यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले.
शेतमजुराचा खून; दोघांना जन्मठेपेची शिक्षा
By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST