उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा संरक्षित केला आहे. सुमारे ७ लाख ४५ हजार ३९० शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपये पीक विम्यापोटी भरल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली असून, महाराष्ट्रात सर्वाधिक खरीप विमा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदाही उशिराने झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडीला ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. दरम्यान, निसर्गाच्या अवकृपेमुळे पिके हाती लागतील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक पिके संरक्षित करण्यासाठी शेतकरी पुढे आल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. उस्मानाबाद तालुक्यातून १ लाख ४१ हजार ५२९ शेतकऱ्यांनी ३ कोटी १९ लाख ९१ हजार रुपये विमा हप्ता भरून पिके संरक्षित केली आहेत. याशिवाय तुळजापूर तालुक्यातून १ लाख २२ हजार ९०० शेतकऱ्यांनी २ कोटी ३० लाख ३३ हजार रुपये, उमरगा तालुक्यातून १ लाख २२ हजार ९० शेतकऱ्यांनी २ कोटी ५७ लाख २७ हजार रुपये, लोहारा तालुक्यातून ५६ हजार ५३९ शेतकऱ्यांनी १ कोटी ३३ लाख ६७ हजार, परंडा तालुक्यातून ६५ हजार ७१७ शेतकऱ्यांनी १ कोटी १२ लाख ६० हजार, भूम तालुक्यातून ४८ हजार ९०८ शेतकऱ्यांनी १ कोटी ९७ हजार, कळंब तालुक्यातून १ लाख २६ हजार ६३८ शेतकऱ्यांनी २ कोटी २८ लाख २ हजार तर वाशी तालुक्यातून ६१ हजार ६९ शेतकऱ्यांनी १ कोटी १० लाख ३९ हजार असे एकूण ७ लाख ४५ हजार ३९० सभासद शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपयांचा विक्रमी पिक भरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सर्वाधिक पिक विमा भरण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी भरला साडेसात लाख विमा
By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST