कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. परिणामी दुग्धोत्पादनही घटले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहेत. आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा फेरा आहे. या तालुक्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. यामुळे आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. या तालुक्यात डोंगराळ भागही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सुपिक जमीन इतर तालुक्यांच्या तुलनेने कमीच आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. पाणीटंचाई व उन्हाळ्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे हिरव्या चाऱ्यांचाही अभाव आहे. त्यामुळे जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. काही शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे हिरवा चारा जोपासला आहे. हा चारा आता २८०० ते ३ हजार प्रतिटन मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली असल्याचे जिजामाता दुध संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले यांनी सांगितले. गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात चारा छावण्या उभारल्या होत्या. त्यावेळी तालुक्यात तब्बल तीन ते साडेतीन लाख दुधाचे उत्पादन होत होते. आता हे दुग्धोत्पादन केवळ दीड लाख लिटरवर आले आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कडा बाजार समितीच्या आवारातून दररोज २८ ते ३० टन ऊसाची खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाने गावोगावी पाहणी करून जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी रवि ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अंकुश तळेकर यांनी केली आहे. प्रशासन म्हणते उपाययोजना करूतालुक्यात सध्या चारा, पाणीटंचाई आहे. यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. या संदर्भात तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले, वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यात येतील. (वार्ताहर)पशुधनाची बेभाव विक्री करू नयेआष्टी तालुक्यात दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरे आहेत.चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री करू नये, असे आवाहन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले.
हिरवा चारा महागल्याने शेतकरी संकटात
By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST