शिरूरकासार : तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कडबा खरेदी करावा लागतो. कडब्याचे दरही कडाडले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.शिरूर तालुक्यात पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतात अद्यापही हिरवा चारा उगवलेला नाही. या परिसरात पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांकडेही घास, मका, कडूळ आदी हिरव्या चाऱ्यांची वानवा आहे. यामुळे शेतकऱ्यांना सध्या चारा टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांकडे दहा हजारांपेक्षा अधिक दुधाळ जनावरे आहेत. या जनावरांसाठी हिरवा चारा, पेंड, कडबा आदी खाद्य लागते. सध्या हिरवा चारा नसल्याने शेतकऱ्यांकडून कडब्याचा वापर होऊ लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ज्वारी कमी असल्याने शेतकरी इतर ठिकाणाहून कडबा विकत आणत आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कडब्याचे दर तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कडबा खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुधाळ जनावरांसाठी हिरवा चारा व कडबाही पुरेसा उपलब्ध होत नसल्याने दुग्धोत्पादनातही घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नही घटले आहे. पावसाअभावी चोहोबाजूंनी शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
कडबा कडाडल्याने शेतकरी संकटात
By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST