चापोली : शासनाने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली आहे. मात्र या विमा योजनेची वेळीच जनजागृती झाली नसल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे चापोलीतील अनेक शेतकरी या विमा योजनेपासून वंचित राहिले.हवामान घटकांच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली. मात्र योजनेची जनजागृतीच झाली नाही. परिणामी ज्या शेतकऱ्यांना या विमा योजनेची माहिती मिळाली, त्यांनी पिकांचा विमा उतरविला. विम्यासाठी सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये गर्दी झाली होती़ व सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी झाली होती. गेल्या वर्षीच्या खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी पेरणी झाल्यावर पावसाने उघाड दिली होती व नंतर तब्बल २० ते २५ दिवस सतत भिज पाऊस पडला. यामुळे पिकांची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळच भेटला नाही. सोयाबीन काढणी वेळेस परत पावसाने झोडपले. याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पन्न घटले. तसेच रबी हंगामही गारपिटीमुळे हातचा गेला. गेल्या वर्षीचा हंगाम हा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचा गेला. सध्याची परिस्थिती ही चिंताग्रस्त करणारी आहे. अजूनही परिसरात १ टक्काही पेरणी झाली नाही. या पीकविमा योजना शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम करणार होती. मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. (वार्ताहर)७४९ शेतकऱ्यांनी भरला विमा...चापोली परिसरातील चापोलीसह शंकरवाडी, ब्रह्मवाडी, अजनसोंडा, येणगेवाडी, आनंदवाडी, हिंपळनेर, नायगाव, हणमंत जवळगा, लिंबवाडी या गावातील ७४९ शेतकऱ्यांनी ११ लाख ११ हजार रुपयांचा पीकविमा भरल्याची माहिती चापोली येथील मध्यवर्ती बँकेकडून मिळाली आहे. हा पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी तुकाराम कासले यांच्याशी संपर्क साधला असता मुदतवाढ मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले़
जनजागृतीअभावी शेतकरी विम्यापासून वंचित
By admin | Updated: July 7, 2014 00:11 IST