बीड : सर्वसामान्यांचा आधारवड व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्याने मंगळवारी जिल्ह्यावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला़ त्यांच्या निधनाने जणू जिल्ह्यावर आभाळच फाटलं़ लाडक्या नेत्याला बुधवारी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देताना ‘नाथा’विना पोरके झाल्याची भावना लाखो चाहत्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती़ गोपीनाथराव मुंंडे यांचे मंगळवारी दिल्ली येथे अपघाती निधन झाले़ त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला़ बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने लातूरला आणले़ त्यानंतर साडेअकरा वाजता पार्थिव हेलिकॉप्टरने परळीला आणण्यात आले़ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वैद्यनाथ कारखाना परिसरात पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती़ याशिवाय केंद्र व राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली़ मुंडे यांच्या निधनाने कार्यकर्ते अतिशय भावूक झाले होते़ परत या परत या, मुंडे साहेब परत या़़़ मुंडे साहेब अमर रहे़़़ या घोषणा देत कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते़ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भावमग्न झाले होते़ सकाळी साडेअकरा वाजता मुंडे यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी फुलांनी सजविलेल्या चबूतर्यावर ठेवण्यात आला़ यावेळी कार्यकर्त्यांचा कंठ दाटून आला़ आ़ पंकजा पालवे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले़ त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांची शपथ घातल्यावर कार्यकर्ते थोडे शांत झाले़ यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. किरीट सोमय्या, खा. अजय संचेती, खा. रामदास आठवले, राजीवप्रताप रूडी, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, माजी खा. सुभाष वानखेडे, बबनराव ढाकणे, महादेव जानकर, विश्वनाथ कराड, पंडितराव दौंड, अर्जुन खोतकर, नामदेव शास्त्री महाराज, पं. वसंत गाडगीळ, सुजितसिंह ठाकूर, प्रा. रवि भुसारी, आशिष शेलार, प्रकाश महाजन, राम भोगले, आ. राम शिंदे, आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. श्रीकांत जोशी, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, सुदाम महाराज पानगावकर, गोविंद घोळवे, माजी आ. शिवाजीराव चोथे, माजी मंत्री शंकरराव राख, विठ्ठल महाराज उपस्थित होते. पंकजा यांनी दिला मुखाग्नी गोपीनाथराव मुंडे यांच्या पार्थिवावर वैदिक पद्धतीने विधी पार पडले़ आ़ पंकजा पालवे यांनी मुखाग्नी दिला़ याशिवाय शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ मुंडे यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले होते़ जवानांनी हवेत २१ फैरी झाडून मानवंदना दिली़ अंत्यविधीनंतर ‘राडा’ अंत्यविधी आटोपल्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड व जाळपोळ केली़ गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी दिसेल त्या मंत्र्यांच्या गाड्या आडविल्या़ त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला़ त्यामुळे एकच पळापळ उडाली होती. (प्रतिनिधी)
फाटलं आभाळ..कसा झाला घात दाटला काळोख..सोडून गेला ‘नाथ’!
By admin | Updated: June 5, 2014 00:12 IST