लातूर : जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास मनपाला अपयश आले असून, आयएमएला मनपाने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. शहरातील रुग्णालयांतील जैविक कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने भस्मीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेकडे केली होती. मात्र मनपा प्रशासनाने या आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रदूषण महामंळाच्या १९९८ च्या नियमामुळे रुग्णालयांना आपल्या रुग्णालयातील जैविक कचरा हा भस्मीकरण केंद्रात नष्ट करावा लागतो़ या जैविक कचऱ्यात रुग्णालयातील वर्गीकृत कचरा आणि अन्य वर्गीकृत कचऱ्यांत हॉटेलमधील टाकून दिलेले अन्न, खाटीक खान्यातील प्राण्यांचे टाकावू अवयव, पॅथोलॉजी मधील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाचीच आहे. त्यासाठी मनपाचे भस्मीकरण केंद्र असावे, अशी आयएमएची मागणी होती. दोन वर्षांपासून आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्या भेटी घेवून तसेच तत्कालीन राज्यमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भस्मीकरण केंद्र तीन महिन्यांत उभारण्याचे आश्वासनही मिळाले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. (प्रतिनिधी)
जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास अपयश
By admin | Updated: January 19, 2015 00:57 IST