वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे सोमवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्याच्या अफवेमुळे वाळूज औद्योगिक परिसरासह शहरात खळबळ उडाली. प्रत्यक्षात मोटार रिवाइंडिंग दुकानातील ज्वलनशील केमिकल जाळत असताना स्फोट झाला होता. यात एका २२ वर्षीय कामगाराचा उजवा हात निकामी झाला आहे. जखमी कामगाराची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त, एटीएस, सीआयडी आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून हा बॉम्बस्फोट नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.इम्रान खान इसा खान पठाण (२२ रा.कमळापूर) हा रांजणगाव शेणपुंजी येथील राम गवळे व भागवत गवळे यांच्याकडे चार वर्षांपासून काम करतो. गवळी यांचे सीएट रोडवर सवाई कॉम्लेक्स येथे आर.बी.इंटरप्रायजेस या नावाचे मोटार रिवाइंडिंगचे दुकान आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास इम्रान खान हा नेहमीप्रमाणे काम करीत होता. ज्वलनशील हार्डर केमिकल असलेला डबा फोडून या डब्यातील केमिकल बाहेर नेऊन जाळण्याचे गवळे यांनी इम्रान यास सांगितले. या ठिकाणी अगोदरच कुणीतरी कचरा जाळल्यामुळे या ठिकाणी इम्रान ज्वलनशील साहित्य आगीत टाकत असताना अचानक मोठा स्फोट झाला. आवाजामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. इम्रान खान याचा उजवा हात मनगटापासून निकामी झाल्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी इम्रान यास पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. इम्रानच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आलीे.
रांजणगावात कचऱ्यात स्फोट
By admin | Updated: August 4, 2015 00:44 IST