लातूर : उशिरा झालेल्या पावसामुळे मुग, उडदाचा पेरा घटला़ सोयाबीनच्या पेरामध्ये मोठी वाढ झाली़ मात्र दोन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरलेली नामांकित कंपनीची बियाणे उगवलीच नाहीत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार २१०० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र अद्यापही कोणत्याच कंपनीने शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पुढे केला नाही. कृषी विभागाने मदत मिळणार असल्याचे सांगितल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार हेक्टर्सवर यावर्षी पेरणी झाली. यात बहुतांश नामांकीत कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्याने जिल्हाभरात दोन हजार हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी मांडल्या़ या तक्रारींचा आकडा २१०० पर्यंत गेला़ कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जावून पंचनाम्याचे काम करण्यात आले. त्यानुसार काही कंपन्यांच्या बियाणात दोष आढळून आला. यासंबंधीचा अहवाल जिल्हा कृषी विभागाच्या वतीने २ सप्टेबर रोजी विभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविण्यात आला़ परंतु, अद्यापही याबाबत कुठलाही निर्णय कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेला नाही़ तसेच यात दोषी आढळलेल्या कंपन्यांना याबाबत कृषी विभागाच्या वतीने नोटिसाही देण्यात आलेल्या होत्या. परंतु, याचे उत्तर मात्र अद्याप एकाही कंपनीने दिले नाही.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना नुसतीच मदतीची अपेक्षा !
By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST