औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकास खुंटला आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठी अपेक्षा व्यक्त होते. परंतु मराठवाड्याच्या पदरी फार काही पडत नाही. किमान यंदाच्या अर्थसंकल्पातून परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबादेत पीटलाईन, रोटेगाव-कोपरगाव, औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्गासह वर्षानुवर्षे रखडलेले रेल्वे प्रश्न, प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न, मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एक तर केराची टोपली दाखविली जाते, अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले. यामुळे परभणी-औरंगाबाद-मनमाड २९१ कि.मी. मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेनेही या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला. मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया आता कुठे पूर्ण झाली. प्रत्यक्षात विजेवर रेल्वे कधी धावेल, असा प्रश्न आहे. एकेरी मार्गामुळे रेल्वेंची संख्या वाढत नाही. परंतु अर्थसंकल्पात परभणी-औरंगाबाद-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह रेंगाळलेल्या रेल्वे प्रकल्पांना यंदा तरी ग्रीन सिग्नल मिळेल का, याकडे लक्ष लागले आहे.
प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
रोटेगाव-कोपरगाव, औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव, पीटलाईन यासंदर्भात अर्थसंकल्पात निर्णय होऊन निधी मिळण्याची अपेक्षा आहे. परभणी-औरंगाबाद-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणालाही मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.
- अनंत बोरकर,
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
१) परभणी-औरंगाबाद-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण.
२) रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग.
३) औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव मार्ग.
४) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई व्हाया पैठण-औरंगाबाद-जळगाव मार्ग.
५) जालना-खामगाव रेल्वे मार्ग.
६) औरंगाबाद- नगर-पुणे मार्ग.
७) औरंगाबादेत पीटलाईन.