शेख महेमूद तमीज, वाळूज औरंगाबादमुरूममाफियांमुळे वडगावच्या पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे तलावातील खड्डे यमदूत बनले आहेत. गत चार वर्षांत तलावातील खड्ड्यात बुडून तीन विद्यार्थ्यांसह गणेशोत्सवात एका गणेशभक्ताचा मृत्यू झाल्यामुळे या तलावाची ओळख ‘मौतका तालाब’ म्हणून होत आहे.येथील पाझर तलावाचा कब्जा मुरूममाफियांनी घेतला असून, तलावात दररोज मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करून मुरूम-मातीची चोरटी वाहतूक करण्यात येते. तलावाच्या पात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी तलावातील या धोकादायक खड्ड्यात पाणी साचत असते. खड्ड्यांची माहिती अनेकांना नसल्यामुळे पोहण्याच्या मोहामुळे गंभीर स्वरूपाच्या घटना घडतआहेत. या तलावातील अवैध मुरूम-मातीकडे महसूल विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणी पिण्यासाठी जाणारी अनेक जनावरेही या खड्ड्यांत पडून मृत्युमुखी पडली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनप्रसंगी संतोष मोरे या कामगाराचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. कारवाई होत नसल्यामुळे या तलावातून दिवस-रात्र मुरूम-मातीची चोरटी वाहतूक सुरू आहे. मुरूममाफियांची दहशत तसेच महसूल विभाग व मुरूममाफियांचे ‘आर्थिक हितसंबंध’ असल्यामुळे या तलावातील मुरूम चोरीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.करोडी-साजापूर परिसरात मुरुम-माती चोरीकरोडी-साजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम-मातीची चोरटी वाहतूक सुरूअसून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.या परिसरातील शासकीय गायरान जमिनीतून दररोज जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करून अवैधरीत्या मुरुम-मातीची चोरी केली जात आहे. सध्या पावसाळा सुरूअसून औद्योगिक परिसरात रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी मुरमाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या शासकीय गायरानातून ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनांतून मुरुममाफिया मुरमाची चोरी करीत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी यंत्राच्या मदतीने जमीन नांगरून मुरुम उकरून ठेवला जातो. यानंतर वाहनाच्या मदतीने मुरमाची चोरटी वाहतूक करण्यात येते. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात मुरमाला चांगली मागणी असून, या बिनभांडवली व्यवसायात अनेकजण उतरले आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे या मुरूममाफियांविरुद्ध कारवाई करण्यास महसूल विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे चोरटी वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.चार वर्षांपूर्वी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूचार वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर २०१० मध्ये बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेचे विद्यार्थी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सुटी असल्यामुळे ऐतिहासिक भांगसी माता गडावर दर्शनासाठी गेले होते. गडावरून दर्शन करून परत येत असताना त्यांना वडगावच्या पाझर तलावात पाणी दिसल्यामुळे पोहण्याचा मोह झाला होता. तलावात पोहत असताना पंकज दत्तात्रय उबाळे (१४), अमन अजय मलिक (१६) व सिद्धांत राकेश रॉय (१७) यांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. नशीब बलवत्तर असल्यामुळे केशव जोशी, रवींद्र राजपूत, अक्षय झांडुरे, मनीष यादव या चार विद्यार्थ्यांचे प्राण वाचले होते. यंदा ८ सप्टेंबरला तलावात श्री गणरायाचे विसर्जन करताना संतोष विठ्ठल सोनवणे या कामगार गणेशभक्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे गणेशभक्त व नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
वडगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात
By admin | Updated: September 11, 2014 01:11 IST