कन्नड : तालुक्यात गाव पातळीवर पैसेवारीसाठी ग्रामसमित्या स्थापन न करताच शासकीय यंत्रणेकडून अहवाल पाठविण्यात आला आहे. यामुळे तालुक्याची पैसेवारी ही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लागली आहे. तथापि अंतिम पैसेवारीकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामसमित्या स्थापन करूनच आहवाल तयार करावा, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनाला केले आहे.
तालुक्यात सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊनही तालुक्यात फक्त २७ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली. तर पीक पैसेवारीसुद्धा ६० टक्क्यांच्या वर लागल्याने पीकविमा मिळण्याचा मार्ग खडतर होत असल्याने शहरातील शिक्षक पतसंस्था हॉल येथे पैसेवारीसंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्वच गावांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जाधव म्हणाले, पीक पैसेवारी जाहीर करताना गावपातळीवर मंडळ अधिकारी, सरपंच, चेअरमन, प्रगतिशील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक यांची समिती स्थापन करून पीक पाहणी अहवाल तयार केला जातो. मात्र, शासकीय यंत्रणेकडून गावपातळीवर कुणालाही विश्वासात न घेता पैसेवारी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला. यामुळे पीक पैसेवारी ६० टक्क्यांच्या वर गेली. मात्र, अजूनही अंतिम पैसेवारी ही १५ डिसेंबरपर्यंत पाठवायची असून यासाठी शासकीय परिपत्रकानुसार उल्लंघन न करता गाव समित्या स्थापन करूनच अहवाल पाठवावा नसता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. चर्चासत्राचे सूत्रसंचालन दादासाहेब मोहिते यांनी केले, तर गणेश पाटील, कृष्णा हार्दे, श्रीराम घुगे, शेख यासीन, रमेश धनकर, बाळू घुले, सोपान शिरसाठ, बापू मोकासे, सुशील गंगवाल, योगेश बिडवे, रामेश्वर बोरसे, बाबूराव बनकर आदींनी परिश्रम घेतले.