लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. भोकरदन, घनसावंगी, अंबड, मंठा, परतूर, बदनापूर तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जालना शहरासह तालुक्यात सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. शहरात हलकासा पाऊस झाला तरी तालुक्यातील इतर ठिकाणी दमदार पाऊस झाला.भोकरदन तालुक्यात पावसाचे समाधानकारक आगमन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पेरणी सुरू केली आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या क्षेत्रासह कपाशी लागवडीला फायदा होणार आहे. मृग नक्षत्रामध्ये योग्य वेळी खरीप पिकांची लागवड झाली तर उत्पादन चांगले येते, असा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रोहिणी नक्षत्रामध्येच चांगला पाऊस झाला. सात जूनपासून मृगनक्षत्र सुरू झाले असून,या नक्षत्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी, मका, मिरची, सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केलेली असल्यामुळे त्यांना या पावसाचा सर्वाधिक फायदा झाला आहे़ यंदा तालुक्यात सोयाबीन, तुरीची लागवड कमी होऊन कापूस, मका व मिरची लागवड वाढण्याची शक्यता आहे़पहिल्याच पावसामध्ये दानापूर येथील जुई धरण, शेलूद येथील धामणा धरण व रेलगाव येथील पाझर तलावात चांगला जलसाठा झाल्याने तालुक्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. दुपारनंतर तळेगाव, हसनाबाद, पिंपळगाव कोलते, जवखेडा, राजूर, केदारखेडा, नांजा, क्षीरसागर, भोकरदन, दानापूर, भायडी, सुरंगळी, देहेड, फत्तेपूर इ. भागांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव, अंतरवाली, मुडेगाव, गाढेसावरगाव इ. भागांत दुपारी दमदार पाऊस झाला. अंबड तालुक्यातील पिंपळगाव, शेवगा भागात दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी प्राप्त पावसाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी २.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२.०५ मिमी पाऊस झाला आहे. अंबड तालुक्यात सर्वाधिक १४.२९ मिमी, तर जालना तालुक्यात ४.३८ मिमी पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By admin | Updated: June 10, 2017 00:09 IST