औरंगाबाद : घराच्या परिसरात खेळत असलेल्या एका सहावर्षीय बालकाचा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शिवराज सतीश पतंगे असे मरण पावलेल्या बालकाचे नाव आहे. काल बुधवारी सायंकाळी शिवराज हा घराच्या परिसरात खेळत होता. जवळच बांधकाम सुरू आहे. तेथे कॉलमसाठी खड्डे खोदलेले असून, त्यात पाणी साचलेले आहे. शिवराज हा खेळता खेळता चार-पाच फूट खोल असलेल्या त्या खड्ड्यात पडला व पाण्यात बुडून तो मरण पावला. दुसरीकडे शिवराज अचानक गायब झाल्यामुळे पतंगे कुटुंबियांनी सर्वत्र त्याचा शोध सुरू केला. तो कोठेही आढळून आला नाही. आज गुरुवारी दुसर्या दिवशी सकाळी शिवराजचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यावर तरंगताना दिसला. ही माहिती पतंगे कुटुंबियांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेऊन आक्रोश सुरू केला. रोज परिसरात खेळणारा- बागडणारा शिवराज मरण पावला, ही मनाला चटका लावणारी घटना पाहून परिसरातील नागरिकांचा कंठ दाटून आला. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शिवराजचा मृतदेह घाटीत नेला. शिवराजचे वडील सतीश पतंगे हे रिक्षाचालक आहेत. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत
By admin | Updated: June 6, 2014 01:10 IST