खुलताबाद : पंचायत समिती भाजपचे सभापती गणेश जिजाबा आधानेंसह त्यांच्या भावाने विरमगाव येथील शिवसंगमेश्वर मंदिरावर अतिक्रमण करून ताबा घेतल्याचा आरोप भास्कर रावसाहेब आधाने यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला. या अतिक्रमणामुळे भाविकांना मंदिरात जाता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याने याबाबत तहसील कार्यालयासह पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे भास्कर आधाने यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
खुलताबाद तालुक्यातील विरमगावात पुरातन शिवसंगमेश्वर (शिवपार्वती) मंदिर असून, येथे दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविक येततात. मात्र, विरमगावातील रहिवासी व पंचायत समितीचे सभापती गणेश आधाने, त्यांचे भाऊ रमेश आधाने व शंकर चंद्रभान आधाने यांनी संगनमताने मंदिराच्या जागेवर तार कंपाऊंड करून भाविकांना दर्शनासाठी जाण्या- येण्याचा रस्ताच बंद केला. या प्रकारामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश आधाने व रमेश आधाने यांनी मंदिरासमोर स्वत:च्या मालकी व कब्जेदार असल्याचा नामफलकसुद्धा लावला आहे. मंदिराच्या मालकीची अडीच हजार चौरस फूट व समोर दहा गुंठे, अशी मोकळी जागा असून, याची ग्रामपंचायत उताऱ्यासह सातबाऱ्यावर नोंद असल्याचे भास्कर आधाने म्हणाले. याबाबत दोन दिवसांपूर्वीच तहसीलदार व खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सभापती आधाने यांच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी मंदिरासाठी अडीच गुंठे जमीन दान केली होती; परंतु दान केलेल्या जमिनीवर त्यांनी पुन्हा ताबा घेतल्याने भाविकांना मंदिरात जाता येत नसल्याची स्थिती असल्याचे भास्कर आधाने यांनी सांगितले.
----- जीर्णोद्धाराच्या नावाखाली गैरव्यवहार ----
सभापती गणेश आधाने यांनी विरमगावातील या मंदिराच्या जीर्णोद्धार व बांधकामाच्या नावाखाली लाखो रुपये जमा करून त्याचा गैरव्यवहार केल्याचा आरोपसुद्धा भास्कर आधाने यांनी पत्रपरिषदेत केला आहे. तहसील प्रशासनाने याबाबत रस्ता बंद केल्याचा पंचनामा केला आहे. या सर्व गैरप्रकाराबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेस राजू आधाने, दिलीप बनकर उपस्थित होते.
--- जमीन आमच्या मालकीची ---
या प्रकरणात सध्या वाद सुरू आहे; पण संबंधित विरमगाव येथील शिवसंगमेश्वर मंदिराची जमीन आमच्या मालकीचीच आहे.
-गणेश आधाने, सभापती खुलताबाद पंचायत समिती
-
----- कॅप्शन :
विरमगाव येथील शिवसंगमेश्वर मंदिरावर सभापती गणेश आधाने व रमेश आधाने यांनी तारकंपाउंड करून कब्जा करीत त्यांच्या नावाचा फलक लावला आहे.