औरंगाबाद : कॉंग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या, असे आवाहन रविवारी येथे प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व मराठवाड्याचे निरीक्षक शिवाजीराव मोघे यांनी केले.
जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मोघे यांनी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या मागण्याही समजून घेतल्या. शासकीय समित्या बोर्डावरील नियुक्त्यांसंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व पक्षाचे संपर्कमंत्री यांना बोलून लवकरात लवकर या नियुक्त्या करण्याची विनंती काँग्रेस पक्षाकडून करण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले, काँग्रेस नेत्यांचे औरंगाबादवर काहीच लक्ष नाही. हे सरकार राज्यांत फक्त राष्ट्रवादीचे आहे आणि औरंगाबाद येथे शिवसेनेचे आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. राज्यातून कोणताही पदधिकारी घड्याळ खिशाला लावून गेला की अजितदादा त्यांना सहज एक कोटी निधी देऊन टाकतात, पण तसे आपल्याकडे कुठे दिसून येतच नाही.
उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब जगताप यांनी आभार मानले. शहर प्रभारी मुजाहेद खान, नामदेव पवार, जि. प. अध्यक्ष मीनाताई शेळके, डॉ. जितेंद्र देहाडे, जी.एस.ए. अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामराव शेळके, संदीप बोरसे, सर्जेराव चव्हाण, भास्कर घायवट, प्रकाश जाधव, बाबासाहेब मोहिते, विठ्ठल कोरडे, भास्कर मुरमे, आप्पासाहेब गावंडे, मजहर पटेल, मृणाल देशपांडे, सरोज मसलगे, अनिता भंडारी, सुनीता मारक, दीपाली मिसाळ, गजानन मते, सुरेश शिंदे, अनुराग शिंदे, विजय जाधव, बाबासाहेब मोकळे, भगवान मते, नंदकिशोर काकडे, हसनोद्दिन कटारिया आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शहर कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही मोघे यांनी स्वतंत्र चर्चा केली.