जालना : शहरातील मंगळसूत्र चोरांनी आता आपला मोर्चा येथील रेल्वेस्थानकाकडे वळविला असून गुरूवारी वैशाली अशोक जोशी (रा.छत्रपती कॉलनी) या महिलेजवळील दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्यात साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. दोन दिवसानंतर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.वैशाली जोशी व त्यांचे पती अशोक जोशी हे गुरूवारी सायंकाळी औरंगाबाद येथे एका लग्नसमारंभास जाण्यासाठी जालना रेल्वेस्थानकावर आले. ६.३० वाजता सिकंदराबाद - मनमाड या पॅसेंजरमध्ये चढताना वैशाली जोशी यांच्या हातातील पर्स चोरट्यांनी अलगदपणे लांबविली. रेल्वेत बसल्यानंतर जोशी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे याबाबतची तक्रार औरंगाबाद येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली. येथील चौकीत ही नोंद वर्ग करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जालना रेल्वेस्थानकावर महिलेची पर्स लांबविली
By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST