परभणी : देशात अतिसार व जुलाबामुळे ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण साधारणत: उन्हाळा व पावसाळ्यात आहे़ कुपोषित मुले व दोन वर्षांखालील मुलांचा यात अधिक समावेश असतो़ त्यामुळे अतिसारापासून बचाव करण्यासाठी शुद्ध पाणी आणि योग्य आहार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी केले़ परभणीत जि़ प़ आरोग्य विभागाच्या वतीने ८ आॅगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवाडा साजरा केला जात आहे़ या अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डुंबरे बोलत होते़ अतिसारामुळे एकही बालमृत्यू होऊ नये, हा पंधरवडा पाळण्यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले़ २८ जूून ते २ आॅगस्ट या काळात अतिसार नियंत्रण कार्यक्रमा संदर्भात योजनांची अंमलबजावणी करण्यात आली़ ४ ते ८ आॅगस्ट या काळात अर्भक व लहान बालके यांच्या आजारासंबंधी जनजागृती केली जाणार आहे़ या मोहिमेत पाच वर्षाखालील बालके, ज्या बालकांना अतिसार आहे आणि कुपोषित आहेत अशा बालकांचे माता, पिता व पालक लाभार्थी असणार आहेत़ गावात गृहभेटी देऊन पाच वर्षाखालील बालकांना ओआरएस पाकिटे व अतिसार प्रतिबंधाविषयी माहिती दिली जाणार आहे़ तसेच कुपोषित मुले ओळखून त्यांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा केली जाणार आहे, अशी माहितीही डुंबरे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
देशात अतिसारामुळे अकरा टक्के बालमृत्यू
By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST