परभणी : शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा बेभरवशाचा झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळी-अवेळी गूल होणारी वीज नागरिकांच्या त्रासात भर घालत असून कंपनीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीने शहरी आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचे नियोजन केलेले आहे. भारनियमनाच्या वेळादेखील ठरलेल्या आहेत. परंतु यावेळे व्यतिरिक्तदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परभणी शहरात काही भागात भारनियमन केले जात असले तरी काही भागात मात्र हे भारनियमन होत नाही. परंतु भारनियमनाव्यतिरिक्तही अनेक वेळा विजेचे येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे वीजपुरवठा कधी खंडित होईल, याचा भरोसा नसतो. उन्हाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उकाडा वाढलेला असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही भारनियमनाव्यतीरिक्त वीज पुरवठा खंडित होतो. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा त्रास नागरिकांबरोबरच व्यापार्यांना देखील सहन करावा लागत आहे. ज्यांचे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत, अशा व्यापार्यांना तर आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागत आहे. (प्रतिनिधी)परभणी शहरात थोड्या प्रमाणात वारे सुटले की, शहरातील वीजपुरवठा बंद होतो. ही बाब नित्याची झाली असल्याने नागरिक त्रस्त आहेत.पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस बाकी आहेत. पावसाळ्यापूर्वीच वीज वितरण कंपनीची ही अवस्था आहे तर पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजपुरवठ्याचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडत आहेत. शहरातील रंगनाथनगर, बेलेश्वरनगर आदी भागात रात्री बेरात्री भारनियमनाव्यतीरिक्त वीज गूल होणे ही नेहमीच बाब आहे. यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असून वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रासात वाढ होत आहे. फ्युजकॉल सेंटरला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर फोन केल्यास तो फोन बंद असतो. कधी लागलाच तर उत्तरही व्यवस्थित मिळत नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
वीजपुरवठा झाला बेभरवशाचा
By admin | Updated: June 5, 2014 00:10 IST