हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे हळद शिजविताना कढईत पडल्याने ६० वर्षीय इसमास अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाल्याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्याने रविवारी गोरेगाव पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली. म्हाळशी येथील संपत नारायण वाठोरे (वय ६०) हे आपल्या शेतात ५ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कढईमध्ये हळद शिजवित होते. त्यावेळी कढईत पडल्यामुळे ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील समोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ६ मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयातील डॉ. ए. एच. वाघमारे यांच्या वतीने वार्ड बॉय प्रफुल्ल अध्याल यांनी पोलिसांना कळविली. त्याबाबतची कागदपत्रे १ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजमोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मुजीब पठाण करीत आहेत. (प्रतिनिधी)
कढईत पडल्याने वृद्धाचा मृत्यू
By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST