विशाल सोनटक्के, उस्मानाबादअत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरींमध्ये अल्पसा पाणीसाठा असला तरी तो उभ्या पिकाला देता येत नसल्याने त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ७७१ ट्रान्सफार्मर फेल झाले असून, ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांना तालुका ते जिल्हा अशा फेऱ्या माराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. विशेष म्हणजे, २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तब्बल २७ ट्रान्सफार्मर नादुरूस्त होते. शहरी भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील नागरिकांची भारनियमनाच्या संकटातून काहीशी सुटका झाली आहे. मात्र, दुष्काळाशी दोनहात करीत असलेला शेतकरी मात्र भारनियमनाच्या कचाट्यात सापडला आहे. ग्रामीण भागात दररोज तब्बल सहा ते दहा तास भारनियमन सुरू असून, काही तांत्रिक अडचण आल्यास भारनियमनाच्या वेळेशिवायही वीज बंद राहत असल्याने तब्बल दोन-दोन दिवस शेतकऱ्यांना अंधारात काढावे लागत आहेत. एप्रिल २०१४ मध्ये तब्बल १२६ ट्रान्सफार्मर जळाले होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफार्मर नादुरूस्तीचा सिलसिला असाच कायम असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्याच्या २२ तारेखपर्यंत जिल्ह्यात तब्बल १५२ ट्रान्सफार्मर जळाल्याची नोंद वीज वितरण कंपनीकडे आहे. वीज चोरी, तसेच अतिरिक्त दाब या प्रमुख कारणांमुळे हे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दोन्ही समस्यांतून मार्ग काढण्यास वीज वितरण कंपनीला अपयश येत असल्याचे दिसते. माहितीही संशयाच्या भोवऱ्यातवीज वितरणकडे अनेक कामांसाठी हेलपाटे मारून शेतकरी त्रस्त आहे. मात्र, अगदी लाईनमनपासून जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही दाद द्यायला तयार नाही. जिल्ह्यातील किती ट्रान्सफार्मर रिप्लेस करून द्यावयाचे शिल्लक आहेत, याची माहिती अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे विचारली असता तेर येथे ३, भूम २, परंडा ३, कळंब १०, वाशी ४ आणि उस्मानाबाद ग्रामीण ५ असे २७ ट्रान्सफार्मर रिप्लेस करून द्यावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच दिवशी वीज वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयाकडे याविषयी माहिती विचारली असता भूम, वाशी आणि परंडा या तीन तालुक्यातच तब्बल २२ ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळेच कंपनीने दिलेली माहितीही संशयाच्या भोवऱ्यात येते. दरम्यान, याबाबत वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांच्याशी संपर्क साधला असता बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जीवघेणी परीक्षा सुरू होते. संबंधित लाईनमनला ट्रान्सफार्मर जळाल्याची माहिती दिल्यानंतर तो याबाबतचा फिल्ड रिपोर्ट सहाय्यक अभियंत्यांना देतो. सहाय्यक अभियंता ही माहिती उस्मानाबाद येथील वरिष्ठ कार्यालयाला कळवितात. त्यानंतर जळालेल्या ट्रान्सफार्मरवर किती कनेक्शन आहेत. तसेच त्यांच्याकडे किती थकबाकी आहे, याची माहिती मागविली जाते. थकबाकी असल्यास ते भरल्याशिवाय ट्रान्सफार्मर रिप्लेस करून मिळणार नाही, असे सांगितले जाते. काही शेतकरी तातडीने पैसे जमा करून त्याच्या पावत्या संबंधित कार्यालयात भरतता. मात्र, एवढ्यावरही या शेतकऱ्यांची सुटका होत नाही. ट्रान्सफार्मर उतरविण्यापासून तो दुरूस्तीसाठी संबंधित कार्यालयात पोहोंचविण्यापर्यंतची सर्व कामे लाईनमनच्या देखरेखीखाली या शेतकऱ्यांनाच करावी लागतात. विशेष म्हणजे, ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी नेताना केलेल्या खाजगी गाडीचा खर्चही अनेक वेळा या शेतकऱ्यांच्याच माथी मारला जात असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही ट्रान्सफार्मरच्या अनुषंगाने अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये तर ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी अवघा एक कर्मचारी असल्याने या कर्मचाऱ्याची बडदास्तही या नागरिकांनाच ठेवावी लागत असल्याचे दिसते. मात्र त्यानंतरही वीज कंपनीला पाझर फुटत नसल्याचे चित्र आहे.
आठ महिन्यांमध्ये े७७१ रोहित्र नादुरुस्त
By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST