औरंगाबाद : पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र नागरिकांच्या प्रतिसादाअभावी ओस पडले आहे. राज्यात शेतीबरोबर अनेक शेतकरी पशू व कुक्कुट पालनचा जोड व्यवसाय करतात. बहुतेक शेतकर्यांना या जोड व्यवसायाची गरज असते. शेतकर्याला लहान-मोठ्या प्रमाणात कुक्कुट पालन करताना मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी पडेगाव येथे उभारलेले मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र शहराबाहेर अडगळीत असल्यामुळे त्याला शेतकरी व व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नाही. तीन कार्यालयीन इमारती व कुक्कुट पालनासाठी सात शेड बांधलेले, असे हे केंद्र आहे. या सगळ्याच इमारतीची देखभाल होत नसल्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. सात शेडपैकी एकाच शेडमध्ये गिरीराज जातीच्या कोंबड्या आहेत. मात्र, त्यांचीही देखभाल व्यवस्थित केली जात नाही हे तेथील परिस्थिती दाखवते. केंद्राकडून शेतकर्यांना कुक्कुट पालन व्यवसायाचे १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, केंद्र दूर असल्यामुळे त्यासाठीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शेतकर्यांना अंडी उबवणूक केंद्रावर जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक, बाबा पेट्रोल पंपमार्गे पडेगाव, असा प्रवास करावा लागत असल्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्याकडे पाठ फिरवीत आहेत. मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्राचे डॉ. परसते यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कोंबड्याच्या पिलांची विक्री चालू आहे. कार्यालयात या महिती देतो’, असे म्हणत त्यांनी मोबाईल बंद केला. केंद्रावरील अधिकार्यांचे कामाचे नियोजन नाही आणि प्रतिसादही मिळत नाही. त्यात केंद्र शहराबाहेर असल्यामुळे गरजूंना वेळेवर माहिती मिळत नाही. अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. -डॉ. एम.एस. स्वामी, कंत्राटदार, मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र पडेगाव येथे अंडी उबवणूक केंद्रावर कुक्कुट पालनाची माहिती घेण्यासाठी गेलो होतो; परंतु तेथील दुरवस्था पाहून निर्णय बदलला. प्रशिक्षण केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र व्यवसाय करण्यासाठी उत्साह निर्माण करणारे असावे. पडेगाव केंद्रावर गेल्यानंतर मरगळ येते. -दिनेश कुरुंद
अंडी उबवणूक केंद्राला घरघर
By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST