उस्मानाबाद : महाविद्यालय प्रवेशासाठी मागील आठवडाभर बहुतांश पालक व्यस्त होते. दाम दुप्पट पैसे मोजूनही हव्या त्या महाविद्यालयात इच्छा, अपेक्षेनुसार प्रवेश मिळाला नसल्याची खंत सुमारे ५४ टक्के पालकांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली असून, तब्बल ७० टक्के पालकांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया किचकट तसेच महागडी असल्याचे म्हटले आहे.यंदा प्रथमच इयत्ता १० वीचा निकाल ८४.७८ टक्के एवढा विक्रमी लागला. मागील वर्षीच्या तुलनेत साडेसात टक्क्यांनी निकाल उंचावल्याने महाविद्यालयीन प्रवेशासाठीची स्पर्धाही अधिक तीव्र झाली. याचेच प्रतिबिंब प्रवेश प्रक्रियेत उमटल्याचे ही आकडेवारी सांगते. ‘लोकमत’ ने शहरातील शंभर पालकांशी या अनुषंगाने संवाद साधला. आपल्या व पाल्याच्या इच्छा, अपेक्षेनुसार हव्या त्या शाखा, संस्थेत प्रवेश मिळाला का? असा प्रश्न पालकांना करण्यात आला होता. यावर ५४ टक्के पालकांनी अपेक्षेनुसार प्रवेश मिळाला नसल्याचे सांगितले. तर ४६ टक्के पालक मात्र याबाबतीत नशीबवान ठरले. दहावीचा निकाल यंदा लक्षणीय वाढला. अनेक विद्यार्थी ९०-९५ टक्क्याच्या घरात होते. मात्र त्यानंतरही या पालकांना प्रवेशासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले. तब्बल ६४ टक्के पालकांनी याची कबुली ‘लोकमत’कडे दिली. तर ३६ टक्के पालकांनी मात्र ठरवून दिलेल्या शुल्कामध्येच प्रवेश मिळाल्याचे सांगितले. कहर म्हणजे, पाल्याला चांगले गुण प्राप्त झाले. तसेच ठरवून दिल्यापेक्षा अधिकचे शुल्क भरण्यास तयार असतानाही अनेक पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी पुन्हा वशीला तसेच शिफारसीसाठी मात्तबरांचे उंबरठे झिजवावे लागल्याचेही या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. ४० टक्के पालकांनी आपल्या पाल्याला चांगले गुण असतानाही तसेच ज्यादा शुल्क देण्याची तयारी ठेवल्यानंतरही शिफारस तसेच वशीला लावावा लागला. (प्रतिनिधी)खाजगी संस्थांवर नियंत्रण हवे...धनदांडग्या लोकांची शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी झाली आहे. समाजातील सर्व घटकाला शिक्षणाची समान संधी द्यायची असेल तर बँकांप्रमाणेच शासनाने शिक्षण संस्थांचेही राष्ट्रीयकरण करुन या संस्था ताब्यात घ्यायला हव्यात, असे मत ए.एम. मुळजकर यांनी नोंदविले आहे. तर तुकाराम पाटील यांनीही सरकारचे खाजगी शाळांवर नियंत्रण हवे, असे सांगितले आहे. सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. त्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठीही शासनाने पुढाकार घेण्याची गरज जितेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केली. शिक्षणाचा खर्च पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहत असल्याची खंत हुकमत मुलाणी यांनी व्यक्त केली आहे. बाजारीकरण थांबले तरच सर्वांना चांगले शिक्षण मिळेल असे त्यांना वाटते. जमीर तांबोळी यांचेही मत असेच आहे. खाजगी संस्था केवळ पैसा कमविण्याच्या हेतूनेच शिक्षणाकडे पाहता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशीच मते के.ए. होनाळकर, मुकेश गायकवाड, युवराज गरड, दीपक बनसोडे, किशोर सूर्यवंशी, बालाजी कदम आदींनी व्यक्त केली आहेत. पालकाचा विश्वास स्वत:वरचपाल्याला चांगले गुण मिळाल्यानंतरही अनेकांना प्रवेशासाठी झगडावे लागले. अनेक ठिकाणी नेमून दिलेल्या प्रवेश शुल्कापेक्षाही अधिकचे पैसे या पालकांनी मोजले. मात्र त्यानंतरही संस्थेपेक्षा खाजगी क्लासवर पालकांचा विश्वास असल्याचे दिसते. तब्बल ६८ टक्के पालकांनी पाल्यासाठी खाजगी क्लास लावणार असल्याचे नमूद केले असून, खाजगी क्लास लावल्यानंतरही तब्बल ८४ टक्के पालक पाल्याचा घरी स्वत: अभ्यास घेणार असल्याचे सांगतात.ेबाजारीकरण थांबवा उच्च शिक्षण ही ठराविक लोकांचीच मक्तेदारी होत आहे. समाजातील तळाच्या घटकाला दर्जेदार शिक्षणाची संधी मिळण्यासाठी शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याची आवश्यकता असल्याचे नागनाथ कांबळे यांच्यासह अनेक पालकांनी ‘लोकमत’ सर्व्हेक्षणावेळी सांगितले. कष्टकरी समाज आज दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे बाबासाहेब केंदळे यांनी म्हटले असून, यामुळे गरीब-श्रीमंत ही दरी रुंदावत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. एम.डी. साठे यांनी शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे. पाल्यांना माफत किंमतीत दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील यांनी शासकीय शाळा, महाविद्यालयाकडे शासनाने अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, त्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. किरण सरवदे यांचेही असेच मत आहे. जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या शाळा ओस पडत आहेत. या शाळा बंद झाल्यास शिक्षण अधिक महागडे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षणाचा खर्च डोईजड
By admin | Updated: July 5, 2014 00:41 IST