लातूर : सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाची दिशा ठरविणार्या मनपा सदस्यांची कचर्याच्या मुद्यावर चांगलीच गोची झाली. घनकचरा व्यवस्थापनासाठी उपविधीचा मुद्दा चर्चेसाठी समोर येताच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजा मणियार यांनी उपविधीतील नियम मराठीत तयार करून सभागृहात मांडा, असा आग्रह धरीत प्रशासनाला धारेवर धरले. ठरावाला सूचक असलेले रविशंकर जाधव यांनी इंग्रजीतील उपविधी वाचून दाखवावा, अशी विनंती करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बराचवेळ गोंधळ घातला. गोंधळातच या ठरावाला काँग्रेसचे गिरीश पाटील यांनी अनुमोदन दिले. लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याच्या मुद्यावरच सभागृहात जवळपास दोन तास चर्चा झाली. इतिवृत्तात दुरुस्ती करण्याच्या सूचना चंद्रकांत चिकटे, दीपक सूळ, राजा मणियार, शैलेश स्वामी, लक्ष्मण कांबळे, रवी सुडे यांनी मांडल्या. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन उपविधीच्या मसुद्याचा विचारविनिमय करण्यासाठी सभागृहात विषय येताच सदरील विषय इंग्रजीत असल्याने याला बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शविला. इंग्रजी भाषेत असलेली २० पानांची नियमावली मराठीत सभागृहात सादर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्याही काही नगरसेवकांनी लावून धरली. इंग्रजीतील उपविधी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी वाचून दाखविला. बराचवेळ सुरू असलेल्या या गोंधळाला महापौरांनी पूर्णविराम दिला. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांचे पालन करून सदरील विषय पुढील बैठकीत सभागृहात मांडण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. मनपास शासनाद्वारे मंजूर झालेल्या आकृतीबंधानुसार विविध पदांवर करावयाच्या नियुक्तीचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप नियमावलीस विचारविनिमय करून निर्णय घ्यावयाचा असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी कर्मचारी भरतीसाठी नगरसेवकांची समिती नियुक्त करा, नियमात बसत असेल तर नगरसेवकांना समितीत सामावून घ्या, अशी मागणी केली. जुन्या कर्मचार्यांना प्रमोशन देत जात पडताळणीची शहानिशा करूनच जागा भराव्यात, अशा सूचना चंद्रकांत चिकटे यांनी केल्या. लक्ष्मण कांबळे यांनी ठराव मांडला. रविशंकर जाधव यांनी याला अनुमोदन दिले. महापौर स्मिता खानापुरे यांनी नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन कारवाई करावी. त्यानंतर सभागृहात हा विषय मांडावा, अशा सूचना केल्या. नरेंद्र अग्रवाल यांनी ५० टक्के पाणी वाया जात असल्याचे सांगत एमजीपीचा कार्यकाळ संपल्यावर ही योजना मनपाकडे वर्ग करावी, अशी सूचना मांडली. सदस्यांच्या सूचनांवरून हा विषय नामंजूर करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, उपमहापौर सुरेश पवार, अतिरिक्त आयुक्त शिवाजी शिंदे यांच्यासह मनपाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. -अधिक वृत्त हॅलो २ वर एमजीपीचा प्रस्ताव नामंजूर... लातूर पाणीपुरवठा योजना, देखभाल व दुरुस्ती व्यवस्थापन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत २० वर्षे चालविण्यासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. तीन वर्षे अजून जुनाच करार संपलेला नसताना मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या या विषयावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अॅड. दीपक सूळ यांनी २० वर्षांचा करार करण्याची एवढी घाई कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी रोष व्यक्त केला. शहरात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ४२ कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार असल्याने २१ कोटी लोकवाटा भरावयाचा आहे. मनपाकडे पैसे नसल्याने ही योजना एमजीपीकडे सोपविण्याचा युक्तिवाद प्रशासनाकडून करण्यात आला. यावर राजा मणियार म्हणाले, तीन वर्षांत आपण सक्षम झालो तर तीन वर्षांनंतर सदरील योजना मनपा प्रशासनाने चालवेल, अशी अट घालूनच या विषयाला मंजुरी द्यावी.
इंग्रजीतील ‘त्या’ उपविधीमुळे सदस्यांची गोची !
By admin | Updated: May 16, 2014 00:14 IST