विष्णू वाकडे, कारलाकारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी खरिपाची पिके तसेच ऊस व मोसंबी बागांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान होत आहे. कारला, हातवण, वडीवाडी, थेरगाव, हिवरा, दोषणगाव, ममदाबाद, भाटेपुरी, माळीपिंपळगाव सह परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.जिल्ह्यात इतरत्र तालुक्यात थोडाबहुत पाऊस पडला. त्यावेळी सुध्दा या भागात पावसाने हुलकावणी दिली. सुरूवातीस अगदी मोजक्याच पावसावर ७ ते ८ जुलै रोजी खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु पावसाने मोठी दडी मारल्याने झालेली पेरणी बहुतांश भागात वाया गेली. गेल्या तीन दिवसांत पुन्हा रिमझिम पाऊस झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाने दुबार पेरणीस सुरूवात केली.कारला भाटेपुरी परिसरात बारामही बागायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मोसंबी तसेच उसाचे उत्पन्न या भागात जास्त आहे. मे महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने आता पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. कुंडलिका नदीला अद्याप एकही पूर तर सोडाच पाणीसुध्दा वाहून गेले नाही. पाण्याचे स्त्रोत फक्त विहिरी असल्याने परिसरात मोठी समस्या निर्माण होत आहे. विहिरी तसेच कूपनलिकांची पाणी पातळी खोलवर गेली आहे. परिणामी मोसंबी चिकु, यांच्यासह उसाचे पीकही धोक्यात आले आहे.शेतकरी गंगाधर सांगोळे यांनी सांगितले की, जिथे दोन कापसाच्या पिकामध्ये लागवड होत होती तेथे आता चार ते पाच पिशव्या कपाशीचे बियाणे लागले. मूग, उडीद, सोयाबीन यांची पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागल्याचे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागल्याचे ते म्हणाले. ऊस उत्पादक यशवंत देशमुख यांनी सांगितले की, सूक्ष्मसिंचनाचा उपयोग करून कसाबसा ऊस आतापर्यंत टिकून ठेवला. परंतु दुष्काळी परिस्थितीने पाण्याची पातळी खालावली. त्यामुळेच उसाचे पीक सुध्दा धोक्यात आले. मोसंबी उत्पादक अशोकराव गायकवाड, सुभाषराव गायकवाड यांनी सांगितले की, मोसंीच्या झाडावर आंबे बहाराच्या मोसंब्या असून फळबागेस पाण्याची नितांत गरज आहे. हात तोंडाशी आलेले पीक कसे पुर्णत्वास जाईल याची चिंता वाटत आहे.शिवाय झाडास सध्या मिळत असलेल्या ताणाने मोसंबीच्या झाडास धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच पावसाअभावी खरीप तर धोक्यात आले आहेच; शिवाय फळबागा व उसाचे पीकही संकटात सापडले आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकट कोसळल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसाअभावी पिके धोक्यात
By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST