बाबूराव चव्हाण , उस्मानाबाददर हजारी मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी मागील दोन दशकांमध्ये शासनाने वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. सामाजिक संघटनांकडूनही जनजागृती केली जात आहे. असे असतानाही जिल्ह्यातील बालिका-बालकांच्या प्रमाणातील दरी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर येते. मागील वीस वर्षामध्ये दर हजारी मुलींच्या प्रमाणात ८० अंकाची घट झाली आहे. तर २०१५-१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक पहाणी सर्वेक्षण अहवालानुसार जन्मत:चे लिंग गुणोत्तर ७६२ एवढे खाली आले आहे. हे धक्कादायक चित्र बदलण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसोबतच अन्य उपाययोजनाही प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. वंशाचा दिवा हवाच, या हव्यासापोटी मागील काही दशकात स्त्रीभृणहत्या वाढल्या. त्यामुळेच दर हजारी मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी होत गेले. सदरील चिंताजनक स्थिती समोर आल्यानंतर शासनाकडून वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. ज्यामुळे मुला-मुलींच्या प्रमाणातील दरी कमी होईल, असा यामागचा उद्देश. एवढे करूनही मुलींचे प्रमाण काही केल्या वाढले नाही. मागील पाच-सहा वर्षांपासून हे प्रमाण उंचाविण्यासाठी शासनाकडून गंर्भलिंग निदान विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्याचप्रमाणे विस्तृत प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून काही जिल्ह्यात मुलींचे प्रमाण किंचितसे वाढले. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला असता, आजही उपरोक्त परिस्थिती फारशी बदलल्याचे दिसत नाही. वीस वर्षापूर्वीच्या म्हणजेच १९९१ च्या जनगणनेतून समोर आलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दर हजारी पुरूषामागे ९४७ स्त्रीया असे लिंग गुणोत्तर होते. विशेष म्हणजे, सर्व आठही तालुक्यांमध्ये हे प्रमाण ९०० पेक्षा अधिक होते.दरम्यान, १९९१ नंतर म्हणजेच दहा वर्षांनी (२००१) जनगणना झाली. या कालावधीत मुलींचे प्रमाण वाढण्याऐवजी आणखीनच कमी झाले. आठ पैकी पाच तालुक्यात दर हजारी मुलींचे प्रमाण ९०० पेक्षाही कमी झाले. तर उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या तालुक्यात मात्र दर हजारी मुलींचे प्रमाण ९०० ते ९५० एवढे होते. सदरील धक्कादायक आकडे समोर आल्यानंतर शासनाने जनजागृतीसोबतच कायद्याचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलींचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. २०११ मध्ये जनगणना झाली असता मागील वीस वर्षांच्या तुलनेत उमरगा वगळता उर्वरित सातही तालुक्यात मुलींच्या प्रमाणात मोठी घट झाली. आठ पैकी चार तालुक्याचे प्रमाण ८०० ते ८५० एवढे खाली आले. लोहारा, उस्मानाबाद आणि तुळजापूर या तालुक्यात हे प्रमाण ८५० ते ९०० दरम्यान होते. मागील वीस वर्षांतील मुलींच्या प्रमाणाचे आकडे पाहिल्यास तब्बल ८० अंकाची घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येते. असे विदारक चित्र बदलण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना योजिल्या जात असल्या मुलींचे प्रमाण वाढण्याचे नाव घेत नाही. केंद्र शासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षामध्ये जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक पहाणी सर्वेक्षण अहवालानुसार स्त्री-पुरूषाचे जन्मत: लिंग गुणोत्तर ७६२ एवढे आहे. याचा अर्थ आजही काही मंडळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून मुलींचा गर्भ जग पाहण्यापूर्वीच नष्ट करण्याचे कृत्य करीत आहेत.
बालिका-बालकांच्या प्रमाणाची रुंदावली दरी!
By admin | Updated: June 23, 2016 01:13 IST