पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा गावात एका तरुणाने एका वीसवर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी या विवाहितेने राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.राणी काळू राठोड (२०) ही विवाहिता २५ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी शिलाई मशीनवर काम करीत होती. याच वेळी गावातील लखन साहेबराव राठोड हा विवाहितेच्या घरी आला. तिला घरात एकटीला पाहून त्याने तिचा विनयभंग केला. बदनामीच्या भीतीपोटी या महिलेने विष प्राशन केले. तिच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा सोमवारी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, फौजदार संपत पवार, सहायक फौजदार अंकुश किंगरे, जमादार सिंघल यांनी पंचनामा केला. या विवाहितेवर सोमवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. काळू राठोड यांच्या फिर्यादीवरून लखन साहेबराव राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.
विनयभंगामुळे विवाहितेची व्यथित होऊन आत्महत्या
By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST