जालना : संपूर्ण जिल्ह्यात अपुऱ्या पावसाअभावी खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले आहेत. परंतु या जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. वास्तविकता सात जूनपासून सात आॅगस्टपर्यंत म्हणजे दोन महिन्यात या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत किमान ६० टक्के पावसाचे प्रमाण राहिले आहे. त्या तुलनेत २० टक्के सुद्धा पाऊस नाही. परिणामी अपुऱ्या पावसामुळेच संपूर्ण जिल्ह्यात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अपुऱ्या पावसामुळेच या जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. सात जूनपासून ते २० जुलैपर्यंत या पेरण्या ठप्प होत्या. चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्यानंतरच जुलैअखेरपर्यंत खरिपाच्या पेरण्या कशबशा पूर्ण झाल्या. मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाअभाची खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. या आठवड्यात सुरुवातीला दोन चार दिवस ढगाळ वातावरण होते. रिमझिम पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठे आहे. कापसाचा पेरा यावर्षीही मोठा आहे. परंतु या वर्षी कापसाच्या लागवडीस मोठा विलंब झाला. उन्हाळी म्हणजे मे अखेर दरम्यान, बड्या शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली. त्या कापसाची वाढ समाधानकारक आहे. गुडघ्यापर्यंत तो कापूस पोहचला आहे. पाते व फुलेही कापसास लगडली आहेत. याउलट खोळंबलेल्या पेरण्यांमुळे उशिरा लागवड केलेल्या कापसाची अवस्था भयावह आहे. केवळ पाच इंचापर्यंतच कापसाची वाढ झाली आहे. या कपाशीस पाते, फुले, बोेंड वगैरे फुलली नाहीत. कापसाप्रमाणेच सोयाबीनचे तीच स्थिती आहे. अपुऱ्या पावसामुळेच काही भागात सोयाबीन जमिनीवर सुद्धा आले नाही. सर्वसाधारणपणे वितभरच या पिकाची वाढ झाली असून, सर्वदूर सोयाबीनची वाढ खुंटल्यानेच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तूर व उडीद या दाळींची अवस्था चिंतनीय आहे. मुळात तूर व उडीदीचा पेराच घटला आहे. त्यातच आता अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट होणार हे स्पष्ट आहे. बागायती शेतीतील उसाची वाढही खुंटलेली आहे. वास्तविकता नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीतीत लावलेल्या उसास वीस ते बावीस कांड्यांपर्यंत वाढ अपेक्षित असताना सद्य स्थितीत उसाची दहा ते बारा कांड्यांपर्यंत वाढ झाली आहे. केळीचीही वाढ खुंटली आहे. या जिल्ह्यात मोसंबीस मोठा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळेच मोसंबीतील अंबे बहाराचे मोठे नुकसान झालेले आहे. (प्रतिनिधी)
खरीप पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST