हिंगोली : काळ बदलला, उत्सवात बदल झाला, साहित्य बदलले, दामही वाढले पण मूर्तीकार आहे त्या ठिकाणीच राहिले. घडविणाऱ्यापेक्षा विकणाऱ्यांचे हात मजबूत झाले. तरीही पिढ्यान् पिढ्यापासून चालत आलेला कलेचा वारसा जपत आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींचे कामही सुरू केले ते तडीस नेले; पण विक्रीची वेळ जवळ आली असताना काळ कोपला. दुष्काळ परिस्थितीमुळे हजारो मूर्तींच्या विक्रीचा यक्षप्रश्न निर्माण झाला. हिंगोलीत गणेशमूर्ती बनविण्याचे काम करणारे मोजून चार घरे. आज त्यांची तिसरी पिढी कलेचा वारसा सांभाळते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्रापासून मूर्ती बनविण्यच्या कामास प्रारंभ केला. वर्षातील सर्वाधिक काम देणारा उत्सव असल्याने स्वत:चे कुटुंब या कामात ओढले. आता उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कारागीर दिवसरात्र घाम गाळू लागले. जवळपास सर्व मूर्तीही तयार झाल्या. केवळ रंगरंगोटी राहिली. दरम्यान, पाऊस गायब झाला. खरिपाची पिके वाळण्यास सुरूवात झाली. बाजार थंडावला, आर्थिक उलाढाल घटली. आता तयार केलेल्या मूर्ती विकल्या जातील की नाही, हा प्रश्न उभा राहिला. दिवसेंदिवस कडक उन्हामुळे प्लास्टर आॅफ पॅरीस जरी तातडीने वाळत असले तरी मूर्तीकारांचा हात चालेनासा झाला. अद्यापही ग्राहक मूर्तीकारांकडे फिरकले नसल्याने कारागीर चिंताक्रांत झाले. आजघडीला तयार हजारो मूर्ती विकण्याचे कोडेच निर्माण झाले. कारण साहित्यासाठी गुंतवलेला पैसाही पावसावर अधारित झाला. सुरूवातीला खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय विक्रेत्यांनी पीओपी पाठवले नाही. साचे तयार करण्याचे साहित्य, नारळाच्या जटा, रबर आदींसाठी मूर्तीकारांना खिसा खाली करावा लागला. मूर्तींसाठी प्रत्येक कारागिरांनी दिवसरात्र एक केला. एवढ्या मेहनतीनंतर तयार मूर्तींना कोणी विचारेनासे झाले. मागील वर्षीसारख्या आॅर्डरही मिळत नाहीत. त्यामुळे आता आखडता हात घेत मूर्तीसंख्या कमी ठेवली. तर आहेत त्या मूर्ती विक्रीसाठी कारागिरांनीही पावसाचा धावा सुरू केला. मूर्तीकारांना गणेश पावणार की नाही, येणाऱ्या काळातील पाऊसच ठरवेल.
गणेशोत्सवावरही दुष्काळाची छाया
By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST