येणेगूर : उमरगा तालुक्यातील कोथळी येथील एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न वागदरी (ता़अक्कलकोट) ग्रामस्थांनी हाणून पाडला़ मुरूम येथील शाळेतून गुरूवारी दुपारी मुलीस पळवून नेणाऱ्या चुलत आत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, कोथळी येथील कल्लेश्वर बाबूराव कोट्टरगे यांची मुलगी सोनी (वय ७) ही मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात शिक्षण घेत आहे़ सोनी ही गुरूवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती़ तर तिचे आई-वडील सोलापूर येथे लग्नास गेले होते़ गुरूवारी दुपारच्या सुमारास सोनीची चुलत आत्या ज्योती कोट्टरगे (राक़ोथळी) हिने सोनीस तुझे मम्मी-पप्पा सोलापूरला गेले आहेत़ तुला बोलाविले आहे असे म्हणून तिस शाळेतून नेले़ बसमध्ये घेऊन तिने वागदरी (ता़अक्कलकोट) हे गाव गाठले़ वागदरी बसस्थानकावर गर्दी असल्याने तुझे पप्पा शेतात आहेत, असे सांगत तिला एका शेतात नेवून तिस विहिरीत ढकलून दिले़ आत्याने अचानक विहिरीत ढकलल्याने सोनीने आरडाओरड सुरू केली़ त्यावेळी ज्योती कोट्टरगे हिने तेथून पळ काढला़ ज्योती पळत असताना व ओरडण्याचा आवाज येत असल्याने शेतकऱ्यांनी पाहिले़ त्यातील काहींनी ज्योतीचा पाठलाग सुरु करुन नजीकच असलेल्या बोळेगाव (ता़तुळजापूर) येथे तिला बसमधून ताब्यात घेतले़ तर काहींनी विहिरीत पडलेल्या सोनी हिस बाहेर काढले़ सोनी पडलेल्या विहिरीतील पाणीउपसा सतत होत असल्याने विहिरीत पाणी कमी होते. वागदरी येथील ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सोनीचे अपहरण करून खून करण्याचा कट उधळला गेला़ वागदरी येथीलच पोना शिवलिंग भोळसगाव हे मुरूम पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत़ ग्रामस्थांनी सोनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना व सपोनि सोपान सिरसाट यांना माहिती दिली़ सपोनि सिरसाट, पोना भोळसगाव यांनी तातडीने वागदरी येथे धाव घेऊन सोनीला व ज्योती कोट्टरगे हिस ताब्यात घेतले़ दरम्यान, ग्रामस्थांनी सोनी हिच्यावर वागदरीतील रूग्णालयात उपचार केले़ या प्रकरणी कल्लेश्वर कोट्टरगे यांच्या फिर्यादीवरून ज्योती कोट्टरगे हिच्याविरूध्द मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सपोनि सिरसाठ हे करीत आहेत़
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अपहृत मुलीच्या खुनाचा प्रयत्न फसला
By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST