औरंगाबाद : महापालिकेने मोंढानाका ते लोटाकारंजापर्यंत ३५ लाख रुपयांच्या खर्चातून केलेला ६०० मीटर रस्ता रिलायन्स ‘फोर-जी’ चे काम करणाऱ्या कंत्राटदाराने आज विनापरवाना खोदून टाकला. प्रभाग ‘ड’ च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ट्रॅक्टर व इतर साहित्य जप्त केले. ‘फोर-जी’ च्या कामासाठी जे रस्ते दिले आहेत, त्या रस्त्यांत मोंढानाका ते लोटाकारंजा या रस्त्याचा समावेश नाही. जुन्या शहरातील तो महत्त्वाचा रस्ता आहे. बाजारपेठेतील तो रस्ता असल्यामुळे रोज हजारो वाहनांची वर्दळ त्या रस्त्यावर असते. त्यामुळे तो रस्ता अचानक खोदून टाकल्यामुळे पावसाळ्यात त्याची वाट लागणार हे निश्चित. फोर-जी चे काम बंद केल्याचे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी जाहीर केले आहे. तरीही शहरातील रस्ते खोदले जात आहेत. नगरसेवक म्हणाले.... नगरसेवक जगदीश सिद्ध म्हणाले, तो रस्ता एक महिन्यापूर्वीच केलेला आहे. आज तेथे फोर-जी चे काम सुरू असल्याचे दिसते. त्या कामाची कंत्राटदाराकडे परवानगी नव्हती. रस्त्याचे काम करण्यापूर्वी ‘फोर-जी’ चे काम करा, असे प्रशासनाला सुचविले होते. तरीही विनापरवाना रस्ता खोदल्यामुळे मनपाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली जाईल. मनपाने काय केले...विनापरवाना रस्ता खोदला जात असल्याची माहिती मिळताच प्रभाग ‘ड’ अभियंता बी. डी. फड यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंत्राटदाराचे ट्रॅक्टर व इतर साहित्य जप्त केले. ‘फोर-जी’ च्या कामाची परवानगी अशीमहापालिकेला रिलायन्स कंपनीच्या ‘फोर-जी’ चे काम करणाऱ्या गुत्तेदारांकडून २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २४ कोटी रुपयांमध्ये १६३ कि़ मी. अंतराचे ७२ रस्ते खोदण्याची परवानगी मनपाने रिलायन्सच्या गुत्तेदाराला दिली. १८ कोटींचा पहिला टप्पा, तर दुसरा टप्पा ६ कोटींचा मनपाला मिळाला. मनपाने सुरुवातीला सव्वा कि़ मी. रस्ता खोदण्याची परवानगी दिली. त्यानंतर ४४.३५ कि़ मी. रस्त्यांसाठी दुसरी, तर ११७.५८ कि़ मी. साठी तिसरी परवानगी दिली. रस्त्याच्या चौकातील भाग मशीनच्या साह्याने खोदण्यात येईल, असे मनपाने जाहीर केले होते. मात्र, कामगारांकडून रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले.
३५ लाखांचा रस्ता महिन्यात खोदला
By admin | Updated: June 20, 2014 01:10 IST