अकोला देव : जाफराबाद तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचे भाव प्रतिशेकडा तीन हजार रुपये असे गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांसमोर एक लाख पशुधनासाठी चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.२०११ ते २०१२ मध्ये पडलेल्या दुष्काळ पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे २०१३ मध्ये अवकाळी पाऊस त्यातच पुन्हा गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन हाती आलेला घासही हिरावून नेला. त्यातच जनावरांचा चारा भिजल्यामळे सडून गेला. उरला सुरला जो चारा शेतकऱ्यांकडे शिल्लक होता तोही व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने खरेदी करून गुजरात राज्याकडे पाठविला. आता या पशुधनाला काय खाऊ घालावे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने एका जनावरास रोज १५ किलो हिरवा तर ६ किलो वाळलेला चारा लागतो.तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी हे पद गेल्या दोन ते तीन वर्षापासून रिक्त असल्याने जनावरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांअभावी जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तालुक्यातत सध्या टेंभूर्णी, जाफराबाद, माहोरा, जानेफळ, खासगाव हे पदे रिक्त आहेत. शासनाने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात व पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जि.प.सदस्या सविता म्हस्के, गणेश म्हस्के, उद्धव दुनगहू, मधुकर गाढे, विजय परिहार, परमेश्वर जगताप, रमेश गायकवाड, सभापती मंदा भागिले, साहेबराव मोरे, रामेश्वर सवडे, देविदास देशमुख यांनी केली आहे. (वार्ताहर)
जाफराबाद तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद
By admin | Updated: August 20, 2014 01:49 IST