बसवराज होनाजे ,जेवळीतीन वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कार्यकारीणीत वाद-विवाद होवून भांडण झाले. त्यामुळे पुढच्या वर्षी जयंती निघेल की नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेवळीतील महिलांनी पुढाकार घेतला. वर्गणी गोळा करण्यापासून मिरवणूक काढण्यापर्यंतचे सारे नियोजन मागील तीन वर्षापासून या महिलाच करीत आहेत. विशेष म्हणजे शांततापूर्ण वातावरणात जयंती काढतानाच प्रत्येक पैशाचा चोख हिशोब ठेवून या महिलांनी सर्वच जयंती मंडळासमोर वेगळा आदर्शही घालून दिला आहे. दहा हजार लोकसंख्या असलेल्या लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी गावात मागील अनेक वर्षापासून पारंपारीक पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे, १९९३ च्या भूकंपानंतर जेवळी या मुळ गावाचे दोन ठिकाणी पुनर्वसन होवून, दक्षिण जेवळी व उत्तर जेवळी अशा दोन गावांची निर्मिती झाली. गावाच्या वाटणीबरोबर कार्यकर्त्यांचीही दोन गावात विभागणी झाल्याने येथे दोन जयंती मंडळे स्थापन झाली.त्यानुसार उत्तर जेवळी या गावातही डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. मात्र उत्सव काळात काहीजण मद्यप्राशन करुन गोंधळ घालत असल्याने या उत्सवी वातावणाला गालबोट लागत होते. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे अनेकवेळा काही कार्यक्रमही रद्द करावे लागले. २०१२ मध्ये असाच प्रकार घडला. त्यामुळे आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावली. हा प्रकार पाहून तेथील महिला संतप्त झाल्या. बाबासाहेबांची जयंती उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरी व्हावी यासाठी धम्म ज्योती बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या पिलाबाई डोंबे, छायाबाई माटे, रंजना माटे, कविताबाई कांबळे, मसाई गवळी, सुनिता गायकवाड, कै. कोंडाबाई बोंदाडे या सात महिलांनी यासाठी पुढाकार घेतला. आणि २०१३ मध्ये पुरुषांच्या सहभागाशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याचा निश्चय केला. त्या दृष्टीने त्यांनी वर्षभर बैठका घेवून जनजागृती केली. पुरुषांना बाजूला सारुन हा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचे पाहून, काही पुरुषांच्या भावना दुखावल्या. त्यांनी दबाव टाकल्याने अनेक महिलाही या कार्यकारीणीत सहभागी झाल्या नाहीत. परंतु सोनप्पा डोंबे, धोंडीराम माटे, रेवप्पा बोंदाडे, विलास माटे आदींनी या महिलांना धिर देवून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जेवळीत महिलांची जयंती कार्यकारीणी स्थापन झाली. या महिलांनी समाजातील संबंधित लोकांकडे वर्गणी जमा करुन पारंपारीक पद्धतीनेच पुरुषांच्या सहभागाशिवाय जयंती साजरी केली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली. शांततेत साजऱ्या झालेल्या या उत्सवाचे गावकऱ्यांनाही कौतुक वाटले. केवळ जयंती काढून या महिला थांबल्या नाहित. तर त्यांनी जयंतीसाठी जमा झालेल्या खर्चाचाचा हिशोबही सर्वांसमोर सादर केला. यामुळे या महिलांची विश्वासार्हताही वाढली. समाजबांधवाबरोबरच ग्रामस्थांनीही या महिलांचे स्वागत करीत सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळेच २०१४ मध्ये महिलांच्या पुढाकारातून काढण्यात येत असलेल्या या जयंती उत्सहात पुरुषांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरवात केली.. गतवर्षीच्या शिल्लक वर्गणीतून समाजमंदिरासाठी खुर्ची, कारपेट, सतरंजी, पंखा आदी वस्तुची खरेदीही या महिलांनी केली आहे. दोन वर्षापासून या उत्सवात पुरुषांचा सहभाग असला तरी महिलांच जयंती कार्यक्रमांचे सर्व नियोजन करीत आहेत. महिलांच्या विचारांना येथे प्राधान्य दिले जात आहे.
जेवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सूत्रे महिलांच्या हाती
By admin | Updated: April 8, 2015 00:49 IST