सितम सोनवणे, लातूरदैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्ती पहाटेच्या वातावरणात चांगली आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी पहाटेचा फेरफटका मारत असते़ त्याला डॉक्टरही अपवाद नाहीत़ पहाटेचा फेरफटका, खेळ यानंतर पहाटे ५़३० पासून आॅपरेशन थिअटरमध्ये वेगवेगळ्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करून नवजीवन देण्याच्या कामाने डॉक्टरांची पहाट सुुरु होते़ गुरुवारी पहाटे ५़३० वाजता डॉ़ विठ्ठल लहाने यांच्या रूग्णालयाला भेट दिली असता, ते रूग्णांचा राऊंड घेऊन पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी निघाले होते़ अर्ध्या तासाचा फेरफटका मारून परत रूग्णालयात आल्यानंतर ६ वाजल्यापासून ६ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले़ पहाटे ४़३० पासूनच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती़ रूग्णांची तपासणी शस्त्रक्रियेसाठी लागणारे ड्रेस रूग्णांना घालून आॅपरेशनसाठी तयार करून सडेशन देण्याचे काम चालू होते़ तसेच आॅपरेशन थिअटरचे निर्जंतुकीकरण व सर्व साहित्याची पाहणी करून घेतली जाते़ त्याचवेळेस भूलतज्ज्ञ डॉ़ राजेश शहा आले़ पहाटे ४ पासून राजेश शहा यांनी तीन रूग्णांवर वेगवेगळ्या रूग्णालयात भूल देऊन शस्त्रक्रियेत मदत करून आल्याचे सांगितले़ डॉ़ विठ्ठल लहाने, डॉ़ राजेश शहा, डॉ़ कल्पना लहाने सोबत परिचारिका वंदना हाके, सहायक मुकेश वरटे यांनी आॅपरेशन थिअटरचे ड्रेस घालून राजश्री अर्जुन नांगरे या ८ महिन्याच्या मुलीची ओठांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरुवात केली होती़ त्यानंतर १० वाजेपर्यंत ५ शस्त्रक्रिया होणार होत्या़ न्यूरो सर्जन डॉ़ हणमंत किनीकर यांच्या रूग्णालयास भेट दिली असता भूलतज्ज्ञ डॉ़ चंद्रकांत शेंदकर, डॉ़ गणेश शेळके, सहायक सतीश गोदाम, संभाजी मगरूळे, परिचारिका संगीता केंद्रे यांच्या चमूने पहाटे ६ पासून ८ वाजेपर्यंत २ शस्त्रक्रिया केल्या होत्या़ नेत्रतज्ज्ञ डॉ़ राम पाटील यांच्या रूग्णालयात डॉ़ राम पाटील, डॉ़ प्रवीण पाटील यांच्यासह डोळ्याच्या मागच्या पडद्याची शस्त्रक्रिया डॉ़ प्रवीण पाटील करत होते़ १० वाजेपर्यंत ८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ अशाप्रकारे डॉक्टरांची पहाट ४़ ३० पासून १० पर्यंत शस्त्रक्रिया त्यानंतर बाह्यरूग्ण विभाग व परत संध्याकाळच्या शस्त्रक्रिया अशी दैैनंदिनीच बनली आहे़ डॉ़ अजय पुनपाळे यांनी २, डॉ़ दिनकर काळे २, डॉ़ शुभांगी राऊत १, डॉ़ व्ही़पीक़ुलकर्णी २, डॉ़ सोपान जटाळ ६, डॉ़ विश्वास कुलकर्णी २ शहरात ३१ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली़ पहाटेच्या चांगल्या वातावरणात चांगली सुरुवात करावी़ तसेच पोस्ट आॅफ केअर करणे महत्वाचे असते़ आॅपरेशन अगोदर, मध्ये व नंतर तिन्ही गोष्टी सुरळीत व्हाव्या, या दृष्टीने रूग्णाची दिवसभर पाहणी करता येते़ पहाटेची शस्त्रक्रिया महत्वाची, असे डॉ़ विठ्ठल लहाने म्हणाले़डोक्याला मार लागलेले, मणक्याचे, मेंदूतील गाठ, अशा किचकट शस्त्रक्रिया कराव्या लागतात़ यासाठी ३ ते ८ तास वेळ लागू शकतो़ त्यासाठी वेळेचे नियोजन पहाटेपासूनच करावे लागत असेल्याचे डॉ़ हनुमंत किनीकर यांनी सांगितले़ पहाटेचे वातावरण आरोग्याला लाभदायी असते़ पहाटेची सुरुवात ताणतणाव विरहित होते़ शस्त्रक्रिया करताना एकाग्रता साधता येते़ पहाटेचे वातावरण शांत असल्याचाही लाभ होतो, असे नेत्रतज्ज्ञ डॉ़ प्रवीण पाटील यांनी सांगितले़
रुग्णांना जीवन देणारी डॉक्टरांची पहाट
By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST